कर्ले महाविद्यालयाच्या वर्धापनदिनीअन्नपूर्णा’तून विद्यार्थी कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ..
⚡देवगड ता.२३-: कर्ले महाविद्यालयाने आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाद्वारे राबविलेला अन्नपूर्णा योजना हा उपक्रम विद्यार्थ्यांना स्वावलंबन, उद्योजकता आणि कौशल्य विकासाची प्रभावी संधी उपलब्ध करून देणारा आहे उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि स्वयंरोजगाराची प्रेरणा निर्माण होईल असे प्रतिपादन संस्थेचे संचालक अँड. प्रकाश जाधव यांनी केले.शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित देवगड तालुक्यातील शिरगांव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाचा ७ वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळीसंस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम म्हणाले, ग्रामिण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणांची सोय व्हावी, पालकांवरील आर्थिक भार कमी व्हावा, तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची परवड थांबावी म्हणून संस्थेने महाविद्यालयाची स्थापना केली. विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उक्रमातून महाविद्यालयाचा नावलौकीकात दिवसेंदिवस भर पडत आहे. संस्थेचे एज्युकेशनल हब उभारणीच्या स्वप्नाला सर्वानी सहकार्य करून बळ द्यावे असे आवाहन त्यांनी केले.वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्यावतीने अन्नपूर्णा योजना या विद्यार्थी उद्योजकता व कौशल्य विकास उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी आठवड्यातून एकदा स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांची विक्री महाविद्यालय परिसरात करणार असून सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाज्या व रानभाज्यांचे विक्री स्टॉलही लावणार आहेत. कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने कृषीप्रधान भारत या भित्तीपत्रकाचे उद्घाटन संभाजी साटम यांच्या हस्ते करण्यात आले.
चौकट स्वयंरोजगाराची मुहर्तमेढ
विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ व इतर उपयुक्त वस्तूंचे उत्पादन व विक्री करून लघुउद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव देण्याचा उद्देश असून यातून विद्यार्थ्यांना व्यवसाय नियोजन, किंमत निर्धारण, विपणन, विक्री, आर्थिक व्यवस्थापन, ग्राहक सेवा आणि नफा-तोटा व्यवस्थापन यांचे व्यावहारिक ज्ञानाबरोबरच स्वावलंबन, शिस्त, टीमवर्क, संवादकौशल्य, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास यांचा विकास होऊन विद्यार्थी भविष्यातील स्वयंरोजगाराची मुहर्तमेढ रोवली जाणार आहे.
वर्धापनदिन सोहळ्यास महाविद्यालयाचे प्राचार्य समीर तारी, शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उदयसिंह रावराणे, अकॅडमिक को-ऑर्डिनेटर सिद्धी कदम, आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख कोमल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख सुगंधा पवार, प्राध्यापिका अक्षता मोंडकर, सोनाली ताम्हणकर, आशय सावंत आदी उपस्थित होते..
