Headlines

सामंत ट्रस्टतर्फे आठ गरजू लाभार्थींना प्रत्येकी १० हजारांची आर्थिक मदत…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते धनादेशांचे वितरण; शिक्षण व विविध आजारांनी ग्रस्त रुग्णांना दिलासा..

⚡सावंतवाडी, ता. २२ -: सावंतवाडी येथील डॉ. परुळेकर नर्सिंग होममध्ये मुंबईस्थित सामंत ट्रस्टतर्फे आठ गरजू लाभार्थींना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते लाभार्थींना आर्थिक सहाय्याचे धनादेश देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत सावंतवाडी येथील पांडुरंग नमशी आणि सांताक्रूझ (मुंबई) येथील अल्पिता शेडगे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक सहाय्य देण्यात आले. तसेच मसुरे येथील रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त ओमप्रसाद शेडगे, ओटवणे येथील स्तनाच्या कर्करोगाने पीडित अक्षता जाधव, पेंडूर येथील आतड्यातील रक्तस्त्राव व ॲनिमियाने त्रस्त भाग्यश्री राऊत, वर्दे येथील पित्ताशयाच्या आजाराने पीडित वासुदेव सावंत, पेंडूर येथील अपस्मार व मानसिक मतीमंदतेने ग्रस्त संजय गावडे, किडनीच्या आजाराने पीडित विद्या ढवळे तसेच नेमळे येथील शस्त्रक्रियेनंतर ग्रॅन्यूलोमा आजाराने पीडित रेश्मा झोरे यांनाही आर्थिक मदतीचे धनादेश प्रदान करण्यात आले.

सामंत ट्रस्टच्या या उपक्रमामुळे शिक्षणासाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच विविध गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोठा आर्थिक आधार मिळाला असून, या सामाजिक उपक्रमाबद्दल लाभार्थी व त्यांच्या कुटुंबीयांनी ट्रस्ट आणि डॉ. जयेंद्र परुळेकर यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page