चौके सरपंच राजा गावडे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
*💫मालवण दि.३१-:* परजिल्ह्यांतून तसेच मुंबई, पुणे येथून गावी येणाऱ्यांना किती दिवस क्वारंटाईन करावे, याचा नवीन आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काढावा व क्वारंटाईनबाबत लोकांच्या मनात असलेला गैरसमज दूर करावा, अशी मागणी चौके सरपंच राजा गावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. ग्रामीण भागात परजिल्ह्यासह पुणे, मुंबई, ठाणे या भागातील चाकरमानी गावी येत आहेत. जिल्ह्यात प्रवेश करताना, खारेपाटण येथे कोरोना तपासणी नाक्यावर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांची कोरोना तपासणी करूनच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जातो, मात्र तेथे असणारे कर्मचारी तीन दिवसांच्या क्वारंटाईनची माहिती देतात. नंतर हे लोक गावात आल्यानंतर ग्रामपंचायतीकडून १४ दिवस क्वारंटाईन राहण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे कोणत्या सूचना खऱ्या याबाबत ग्रामस्थांच्या मनात संभ्रम आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी क्वारंटाईनबाबत नवीन आदेश काढावेत, अशी मागणी गावडे यांनी केली आहे.
