संशयिताला अवघ्या काही तासांत अटक
कणकवली : कणकवली शहरातील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अवघ्या काही तासांत कणकवली पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जलद तपास करत पोलिसांनी ही कारवाई केली.
अथर्व राणे (वय २० रा. कळसुली – गवसेवाडी, ता. कणकवली) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याची माहिती कणकवली पोलिसांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्या आधारे संशयिताची ओळख पटवून त्याला त्याच्या राहत्या घरातून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक तपासात संशयित अथर्व राणे हा कळसुली – गवसेवाडी येथे नातेवाईकांकडे राहत असून, काहीवेळा बिडवाडी येथील नातेवाईकांकडेही वास्तव्यास असतो, अशी माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली.
या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एटीएम फोडण्याचा कट कसा रचला, त्यामागे आणखी कोणी साथीदार आहेत का, तसेच चोरीचा नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास कणकवली पोलीस करत आहेत. संशयिताला आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, तातडीने तपास करून काही तासांतच संशयिताला जेरबंद करणाऱ्या कणकवली पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
