⚡वेंगुर्ला ता.१०-: वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी हा महत्त्वाचा मार्ग आहे. नुकतीच मठ मार्गावरील विद्युत वितरण मार्फत थोडीफार झाडी कटिंग करून साईडपट्टीवर व गटारात टाकण्यात आली आहे. त्यामुळे येथे भाजपाचे स्थानिक पदाधिकारी अजित नाईक यांनी केवळ दिखाव्यासाठी काम केले काय? असा सवाल वाहनधारकातून व्यक्त होत आहे.
तसेच याच मार्गावरील आडेली खुटवळवाडी, पोस्ट थांबा व वजराट तिठा आदी ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गतिरोधक बसविण्यात आल्याने काही वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कामळेवीर तसेच आडेली पोस्ट थांबा वळणावर व अन्य भागात झाडी कटिंग करून चांगले काम केले आहे. परंतु उर्वरित भागात आडेली खुटवळवाडी, आडेली जांभरमळा आदी ठिकाणी धोकादायक वळणावर झाडी तोडण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे येथेही आडेलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू कोंडसकर यांनीही संबंधित विभागामार्फत गतिरोधक बसूवून जनतेला खुश केले आहे. परंतु उर्वरित झाडी न तोडता केवळ दिखावा केला की काय? असा सवाल वाहनधारकातून व्यक्त करण्यात आला आहे. आडेली जांभरमळा, मठ ठाकूरवाडी, मग टाकयेवाडी आदी वळणावर, श्री देव बादेश्वर मंदिर समोर एरिया झाडी व जीर्ण झाडे लोम्बकळत असून तसेच पावसामुळे झाडी वाढल्यामुळे ही झाडी सर्वच वाहनधारकांना धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या ठिकाणी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे तसेच स्थानिक जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, स्थानिक पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी तातडीने लक्ष पुरवून वाहनधारकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिक तसेच वाहनधारकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत केलेल्या कामाची वस्तुनिष्ठ काम झाले आहे का? याबाबत मुख्य मार्गावर ठिकठिकाणी वळणावर धोकादायक स्थिती असल्याने वेंगुर्ला पंचायत समिती सभापती यांनी तातडीने पाहणी करावी, अशीही मागणी जनतेतून करण्यात आली आहे. याच मार्गावर धोकादायक वळणावर चार ठिकाणी रस्ते अपघातात युवकांचे अगदी दिवसा बळी गेले आहेत. ही बाब गंभीर असूनही संबंधित विभाग, शासनाचे कायम येथे दुर्लक्ष होत आहे. जि. प. पू. प्राथमिक आडेली खुटवळवाडी शाळा नं. 2 नजिक रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी कटिंग करण्याकडे संबंधित जिल्हा परिषद विभागाचे दुर्लक्ष झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
