शोधत होते फरार आरोपी, मिळाली अवैद्य दारू

स्थानिक गुन्हा अन्वेषणने पकडली ४० लाखाची दारू

*💫कणकवली दि.३१-:* २०२१ ची रात्र. सावंतवाडी येथील न्यायालयीन कोठडीतून पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस कुडाळ व कणकवली पोलिस ठाणे हद्दीत रवाना झाले. पोलिस त्या फरार आरोपीचा शोध घेत होतेच. तेवढ्यात एक आयशर टेम्पो गोवा बनावटीची दारू भरून मुंबईच्या दिशेने जात असल्याची विश्वसनीय बातमी विश्वसनीय बातमीदाराकडून मिळाली. पोलिस तडक मुंबई-गोवा महामार्गाने त्या टेम्पोच्या मागावर निघाले. पहाटे ३.१० वाजण्याच्या दरम्यान महामार्गावर तळेरे एस. टी. स्टँड समोरील ब्रीजवर एक आयशर टेम्पो क्र. GI-24-X-0911 हा मुंबईच्या दिशेने जात असलेला पोलिसांना दिसला. त्यावेळी सापळा रचून सदर टेम्पो पोलिसांनी थांबवला. आतील चालक आणि क्लिनरकडे आतील सामानाबाबत विचारणा केली. तर त्यांनी आत मेडिसीन असल्याचे सांगून त्याबाबतची बिले हजर केली. परंतु संशय बळावल्याने पोलिसांनी तो टेम्पो कणकवली पोलिस ठाण्यात आणला आणि तिथे टेम्पोच्या झडपास असलेले सिल तोडून पाहिल्यावर आत गोवा बनावटीच्या दारुने भरलेले तब्बल ४० लाख २५ हजार किमतीचे बाटल्यांचे बॉक्स दिसून आले. त्यामुळे फरार आरोपीच्या मागावर गेलेल्या एलसीबीच्या हाती ४० लाखाच्या अवैध दारूचं घबाड सापडलं आहे. गोव्याहून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या या आयशर टेम्पो मध्ये इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल चॅलेंज, ब्लेंडर्स प्राईड, मेगडॉल अशी एकूण ३५७ बॉक्स ची वाहतूक या टेम्पोतून होत होती. दारू व टेम्पो मिळून एकूण ५५ लाख २५ हजाराचा मुद्देमात पोलिसांनी हस्तगत केला आहे. टेम्पो चालक शंभुसिंग भैरुसिंग राजपुत (वय 26, रा. राजस्थान) आणि महेंद्रसिंग खेमसिंग चौहाण (वय २५, रा. राजस्थान) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, हवालदार गुरुनाथ कोयडे, प्रकाश कदम, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, ज्ञानेश्वर कांदळगावकर, प्रथमेश गावडे, रवी इंगळे, सचिन घाडगे, चंद्रकांत पालकर आदीच्या पथकाने केली आहे. या कारवाईबद्दल स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे कौतुक केले जात आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाकडून धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून, या कारवाईमुळे अनेक अवैध धंदेवाल्याचे धाबे आता दणाणले आहेत.

You cannot copy content of this page