Headlines

विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात…

अभिषेक गावडे:जनतेवर अन्याय होऊ देणार नाही..

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. नागरिकांना हरकती नोंदविण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आवश्यक ते सहकार्य केले जात असून, विकास आराखड्यामुळे कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही किंवा कुडाळ शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्या शिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही.याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही नगरसेवक अभिषेक गावडे यांनी दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात श्री. गावडे म्हणतात की, कुडाळ शहराचा विकास आराखडा हा नव्याने तयार करण्यात आलेला नसून, यापूर्वीच तो तयार करण्यात आला होता. मात्र, तो नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला नव्हता. आता पुढील वीस वर्षांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, नागरिकांना आपली मते, सूचना आणि हरकती नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्या शिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही. अशा आमदार निलेश राणे यांच्या कुडाळ न. पं प्रशासनाला सूचना आहेत.
विकास आराखडा जनतेपासून लपवून किंवा नागरिकांना अंधारात ठेवून मंजूर करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उलट नागरिकांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उगाच कोणाला आंदोलन करायची गरज नाही.
आराखड्यातील विविध आरक्षणे, रस्ते, सार्वजनिक सुविधा किंवा इतर कोणत्याही बाबींविषयी नागरिकांना आक्षेप अथवा सूचना असल्यास त्या ८ जुलैपर्यंत नगरपंचायत कार्यालयात नोंदविता येणार आहेत. या प्रक्रियेत नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचेही गावडे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांनीही या विषयात विशेष लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या असून, विकास आराखड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच कुडाळ शहरातील नागरिकांना विश्वासात घेतल्या शिवाय सदरचा आराखडा मंजूर होणार नाही.त्यामुळे कोणाला आंदोलन करायची गरज पडणार नाही असे अभिषेक गावडे यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page