नगरसेवक रविकिरण तोरसकर यांची आम. प्रमोद जठार यांच्याकडे मागणी
मालवण (प्रतिनिधी)
गेल्या काही वर्षांमध्ये किनारपट्टी भागात व्हेल माशाची उलटी सापडण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या पदार्थाच्या कथित तस्करीवरून स्थानिक मच्छिमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांवर गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अंबरग्रीस संदर्भातील कायद्यातील गुंतागुंत, प्रशासनातील गैरसमज आणि मच्छिमारांचे होणारे नुकसान यावर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आवाज उठवावा, अशी मागणी मालवण नगरपरिषदेचे स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर यांनी आमदार प्रमोद जठार यांच्याकडे केली आहे. या मागणीला आमदार जठार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या विषयावर कायदेशीर आणि शास्त्रोक्त माहिती घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.
स्पर्म व्हेल हा मासा ‘वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ अंतर्गत संरक्षित प्राणी आहे. त्यामुळे त्याच्या शरीरातून उत्सर्जित होणारा ‘अंबरग्रीस’ हा पदार्थही कायद्याच्या चौकटीत संरक्षित केला गेला आहे. परंतु, हा पदार्थ उत्सर्जित झाल्यानंतर तो संरक्षित असावा की नसावा, याबाबत तज्ज्ञ आणि सर्वसामान्यांमध्ये मोठे मत-मतांतरे आहेत.
सध्या या पदार्थाची सत्यता तपासणारी सक्षम यंत्रणा उपलब्ध नसल्याने अनेकदा कायद्याचा दुरुपयोग होतो, तर काही वेळा अनवधानाने मच्छिमार व नागरिक तस्करांच्या जाळ्यात अडकतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रातील मत्स्य, फॉरेस्ट, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एकत्रित येत एक विशेष अभ्यास गट स्थापन केला आहे. या गटाला भारतातील राष्ट्रीय स्तरावरील मत्स्य संशोधन केंद्राच्या नामांकित शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.
या अभ्यास गटाने किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या पारंपरिक ज्ञानाचा आणि आधुनिक विज्ञानाचा मेळ घालून एक सविस्तर अहवाल व संकलित माहिती प्रशासनाकडे सुपूर्द केली आहे. अंबरग्रीस संदर्भातील कायद्यात आणि सरकारी धोरणात योग्य ते बदल व्हावेत, यासाठी हा अहवाल मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अंबरग्रीस संदर्भात प्रशासन आणि नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. सत्यता तपासणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादांमुळे निष्पाप मच्छिमारांवर कारवाईची टांगती तलवार असते. यामध्ये कायदेशीर आणि धोरणात्मक बदल होणे गरजेचे आहे. यासाठीच आमदार प्रमोद जठार यांच्या माध्यमातून हा विषय विधिमंडळात मांडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही श्री. तोरसकर यांनी स्पष्ट केले आहे.
