Headlines

कुडाळमध्ये ‘पुरुषांची वटपौर्णिमा’ उत्साहात

‘जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी’ म्हणत पतींनी पुजला वटवृक्ष!

​कुडाळ : स्त्री आणि पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाके आहेत. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून, कधी मैत्रीण तर कधी कुटुंबाचा मुख्य आधार बनून अहोरात्र कष्ट करणाऱ्या पत्नीप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी कुडाळमध्ये एक अनोखा आणि कौतुकास्पद सोहळा पार पडला. कुडाळ येथील गवळदेव येथे उमेश गाळवणकर मित्र मंडळ व डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २९ जून रोजी ‘पुरुषांची वटपौर्णिमा’ अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, सामाजिक रूढी-परंपरांना नवा सकारात्मक दृष्टिकोन देणारे हे व्रत गेल्या १८ वर्षांपासून येथे अविरतपणे सुरू आहे.
​आपल्या सुख-दुःखात सावलीसारखी सोबत देणाऱ्या पत्नीला दीर्घायुष्य लाभावे आणि ‘जन्मोजन्मी हीच पत्नी आपणास सहचारिणी म्हणून मिळावी’ या कृतज्ञतेपोटी आणि श्रद्धेपोटी या अनोख्या वटपौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गवळदेव येथे पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आणि उपस्थित पतींच्या शुभहस्ते वटवृक्षाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व पुरुषांनी वडाला सात फेऱ्या मारून पत्नीच्या आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
​या आगळ्यावेगळ्या सोहळ्यामध्ये परिसरातील अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यामध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था चेअरमन ​उमेश गाळवणकर, बॅ नाथ पै महिला महाविद्यालय व रात्र महाविद्यालयचे प्राचार्य अरुण मर्गज, बी एड कॉलेज ​प्राचार्य परेश धावडे, ​प्रा. नितीन बांबर्डेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार ​राजू कलिंगण, उमेश दाभोलकर, ​डॉ. प्रणव व चैताली प्रभू, ​प्रसाद कानडे, महादेव परब, ओंकार कदम, संतोष पडते, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली यांसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“स्त्री नेहमीच पतीला देव मानून सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून व्रत वैकल्ये करते. मग पुरुषानेही आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या, अहोरात्र झटणाऱ्या पत्नीचा सन्मान का करू नये? पत्नी ही केवळ अर्धांगिनी नसून ती उत्तम सल्लागार, मैत्रीण आणि कुटुंबाची खरी ताकद असते. तिचा आदर करणे आणि जन्मोजन्मी तीच आपल्याला मिळावी ही भावना ठेवणे हेच प्रत्येक पुरुषाचे कर्तव्य आहे,” असा मोलाचा संदेश या व्रताच्या माध्यमातून देण्यात आला.
​१८ वर्षांची अखंड परंपरा असलेला हा सोहळा यंदाही कुडाळमध्ये कमालीचा चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला.

You cannot copy content of this page