Headlines

२१ कामांच्या निविदेवरून सत्ताधारी – विरोधकांमध्ये वादंग…

कणकवली नगरपंचायतची बैठक ठरली वादळी..

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या प्रशासकीय राजवटीत मंजूर करण्यात आलेल्या २१ विकासकामांच्या निविदा रद्द करण्याच्या निर्णयावरून नगरपंचायतीच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी गटामध्ये जोरदार वादंग निर्माण झाला. या निविदा रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी विरोधी गटाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. मात्र निविदा रद्द करण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांचा असून त्याबाबतचा कोणताही प्रस्ताव कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांनी विरोधी गटाचा अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे २१ कामांच्या फेरनिविदा काढण्याचा मार्ग मोकळा झाला असून या मुद्द्यावरून सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली.

कणकवली नगरपंचायतीची मासिक सभा नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या अध्यक्षतेखाली प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, मुख्याधिकारी गौरी पाटील, नगरसेवक रुपेश नार्वेकर, सत्यजित उर्फ बाळू पारकर, जयेश धुमाळे, संकेत नाईक, लुकेश कांबळे, सुमेधा अंधारी, दीपिका जाधव, जाई मुरकर, विरोधी पक्ष गटनेत्या सुप्रिया नलावडे, गणेश उर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर, मेघा गांगण, प्रतीक्षा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, मेघा सावंत यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अमोल अघम तसेच नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सभेच्या सुरुवातीलाच २१ विकासकामांच्या निविदांचा मुद्दा चर्चेला आला. प्रशासकीय राजवटीत मंजूर झालेल्या या कामांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी गटाने घेतला होता. या निर्णयाला विरोध करत विरोधी गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. निविदा रद्द करण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधी गटाने केला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात निविदा रद्द करण्याचा अधिकार मुख्याधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्ट केले. तसेच यासंदर्भातील कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेला नसल्याने विरोधी गटाचा अर्ज फेटाळण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर सभागृहात सत्ताधारी गटाने आपली भूमिका ठामपणे मांडली. २१ कामांच्या फेरनिविदा तातडीने काढून तीन दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर सभागृहात दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काही काळ वातावरण तंग झाले होते. सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. अखेर नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करून चर्चा सुरळीत मार्गी लावली.

दरम्यान, बैठकीत शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषयही चर्चिले गेले. कणकवली शहरातील क्रीडासंकुलाच्या जागेत दर गुरुवारी गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी सभागृहाला दिली. स्थानिक शेतकरी, महिला बचत गट आणि ग्रामीण भागातील उत्पादकांना आपला माल विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील खुले क्षेत्र विकसित करण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्यात येणार असून नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध जागांचा विकास केला जाणार असल्याचेही पारकर यांनी स्पष्ट केले. शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आणि नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध विकास आराखडा तयार केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

जनगणनेअंतर्गत शहरातील लोकसंख्या १५ हजार २०० असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तसेच शहरात सुमारे १२ हजार घरे असल्याचा डेटा उपलब्ध झाला आहे. नगरपंचायतीच्या नोंदीनुसार शहरात ८ हजार ६०० घरे आहेत. त्यामुळे उर्वरित घरांपैकी किती घरे अधिकृत आहेत आणि किती अनधिकृत आहेत, याचा स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात यावा, अशी सूचना नगराध्यक्षांनी प्रशासनाला केली. घरपट्टी वाढविण्यापूर्वी संपूर्ण वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यात यावा आणि त्यानंतरच सभागृहात याबाबत निर्णय घेण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीत नगरपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याचा मुद्दा विरोधी गटाच्या सदस्यांनी उपस्थित केला. कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी आणि भविष्यात अशा समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावर प्रशासनाने लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

याशिवाय उड्डाणपुलाखालील परिसराच्या सुशोभीकरणाचा विषयही चर्चिला गेला. या परिसराचे आकर्षक आणि नागरिकांसाठी उपयुक्त असे रूपांतर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्याची माहिती नगराध्यक्षांनी सभागृहासमोर मांडली. शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा नगरपंचायतीच्या वतीने गुणगौरव करण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

विविध विकासकामे, आर्थिक विषय, नागरी सुविधा आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर झालेल्या चर्चेदरम्यान अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी गट आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. मात्र सर्व विषयांवर चर्चा करून पुढील कार्यवाहीसाठी निर्णय घेण्यात आल्याने बैठक अखेर सुरळीतपणे पार पडली.

You cannot copy content of this page