केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किपरॉप स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर :आतापर्यंत देशभरातून १५०० च्या वर धावपटूंची नोंदणी..
⚡कुडाळ ता.१७-: येथील राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या मार्फत येत्या १२ जुलैला कुडाळ मॉन्सून रन २०२६ च आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं या मॉन्सून रनच हे तिसरं वर्ष आहे. या मॉन्सून रनचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून केनियाचा महान आंतरराष्ट्रीय धावपटू ऑलिम्पिक पदक विजेता विल्सन किपरॉप हा पहिल्यांदाच कोकणात येत आहे. अशी माहिती राणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. जी. टी. राणे यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राणे हॉस्पिटल बरोबरच सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फ्रेटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या मॅरेथॉन स्पर्धंच आयोजन करण्यात आलं आहे. ५, १०, १६ आणि २१ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धा असणार आहेत. आतापर्यंत देशभरातून सुमारे पंधराशे धावपटूंनी नोंदणी केली असून २० जून हि नोंदणीची शेवटची तारीख असल्याचं डॉ. राणे यांनी सांगितलं.
कुडाळ मॉन्सून रन २०२६ बाबत माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत. यावेळी राणे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे डॉ. जी. टी. राणे, गजानन कांदळकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. जयसिंह रावराणे, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, साईराज जाधव, मकरंद नाईक आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. जी. टी. राणे यांनी सांगितलं, शरीर आणि मन यांच्यातील संतुलन उत्तम राखण्यासाठी आजच्या व्यस्त दिनक्रमात व्यायामाला अग्रक्रम देणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे आणि याच कल्पनेतून नागरिकांमध्ये चालणे, धावणे आणि निरोगी राहण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यंदाही ‘कुडाळ मॉन्सून रन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स, रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि डॉक्टर्स फॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १२ जुलै २०२६ रोजी या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण यशासह हा उपक्रम तिसऱ्या वर्षात वाटचाल करत आहे.
‘राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर’ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नवा आरोग्य आधार ! गेल्या ४ वर्षांपासून राणे हॉस्पिटल व मेडीकल रिसर्च सेंटर हे रुग्णसेवेचे एक उत्तम उदाहरण बनले आहे. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये जाणाऱ्या रुग्णांना आता कुडाळमध्येच सर्वसमावेशक उपचार मिळत आहेत. विशेषतः ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’ मुळे अनेक गोरगरीब रुग्णांना मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीची जीवनदायी सुविधा मिळाली आहे. याशिवाय रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून हॉस्पिटल विविध मोफत शिबिरे (रक्तदान, श्रवणदोष, दंत, फिजिओथेरपी) आणि योग शिबिरांचे आयोजन करत असते. सोबतच, रुग्णांच्या तातडीच्या मदतीसाठी वाजवी दरातील अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. देशाची खरी संपत्ती म्हणजे तिथली निरोगी जनता. याच विचाराने ३ वर्षांपूर्वी ‘राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर’ने एका मॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली. समाज निरोगी आणि आनंदी असावा, यासाठी आमची संपूर्ण टीम अविरत प्रयत्नशील आहे. कारण, सुदृढ नागरिकच एका ‘सशक्त राष्ट्राचा’ भक्कम पाया असतात.
आज आपली स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली असून, परदेशी स्पर्धकही यात सहभागी होत आहेत. यावर्षी स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे केनया देशातून “इंटरनॅशनल वर्ल्ड मॅरेथॉन विनर व ऑलिम्पिक चॅम्पियन” विल्सन किपरॉप आपल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. आपल्याला त्यांच्याबरोबर भाग घेण्याची व धावण्याची सुवर्णसंधी लाभणार आहे, असे डॉ. जी. टी. राणे यांनी सांगितले.
गजानन कांदळगावकर म्हणाले, मागील दोन वर्षांतील मॅरेथॉन स्पर्धा शिस्तबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. २०२४ मधील ७५० आणि २०२५ मधील १३५० धावपटूंचा वाढता प्रतिसाद, हे आपल्या यशाचे गमक आहे. याच शानदार यशाची दखल घेत ‘मुंबई रोड रनर्स’ने आपल्या स्पर्धेला ‘Best Rated Half Marathon of The Year 2024’ चा मानाचा पुरस्कार दिला आहे.
ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल, डिजिटल सर्टिफिकेट व तसेच प्रत्येक गटामधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देण्यात येते. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देखील दिले जाणार आहे. असं डॉ. प्रशांत सामंत यांनी सांगितल. हि मॅरेथॉन बॅ. नाथ पै विद्यालय, एम.आय.डी.सी, कुडाळ येथून सुरू होऊन नेरूर मार्गे वालावल श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथील नदीकाठी जाऊन पुन्हा बॅ. नाथ पै विद्यालय, एम.आय.डी.सी, कुडाळ येथे येऊन संपणार आहे. ही स्पर्धा ५ किमी, १० किमी, १६ किमी व २१ किमी या अंतरासाठी घेतली जाणार असून वयोगट तयार करून त्याप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत. असेही डॉ. सामंत म्हणाले.
यावेळी डॉ. जयसिंह रावराणे, रुपेश तेली आणि साईराज जाधव यांनी देखील माहिती दिली. शिवप्रसाद राणे म्हणाले कि हि मॅरेथॉन पावसात आयोजित केली जात आहे. पण तरीसुद्धा स्पर्धेच्या वेळी पाऊस आला नाही तर कृत्रीम पावसाच्या शॉवरसाठी जागोजागी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्यने या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याबरोबरच प्रेक्षक म्हणून देखील या स्पर्धेचा आनंद घ्या असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
