कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा; युवासेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांची मागणी..
⚡कणकवली ता.१७-: जिल्हा परिषदेतील बनावट सही प्रकरण फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आले असताना संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल होण्यासाठी दोन ते तीन महिने का लागले, असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता का, अशी शंका युवासेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांनी व्यक्त केली. शिवसेना कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी लोके म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणामागे ‘गॉडफादर’ असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर चौकशीअंती कठोर कारवाई करावी. संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांना अद्याप ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले नाही. त्यांना जिल्हा परिषद कार्यालयात वावर करण्यास मज्जाव करण्यात यावा, तसेच त्यांच्या सर्व कामांची आणि बिलांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणात केवळ काही लाखांचा नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय असून, संबंधित कामांची बिले, मंजुरी प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती जनतेसमोर आणावी. तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक कागदपत्रांमध्ये फेरफार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा आरोपही त्यांनी केला.
जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत अनेक ठिकाणी निकृष्ट कामे झाल्याचा आरोप लोके यांनी केला. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कारवाई केली नाही, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच संबंधित ठेकेदारांना कामे करू दिली जाणार नाहीत, असा इशाराही उत्तम लोके यांनी यावेळी दिला.
