अमित सामंत:
ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; अन्यथा आंदोलनाचा इशारा..
⚡वेंगुर्ला ता.१७-: आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मायनिंग प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध दर्शविला असून ग्रामसभांच्या ठरावांना डावलून प्रशासनाने संबंधित कंपनीला परवानगी कशी दिली, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आजगाव, धाकोरे, आरवली, सोन्सुरे, मळेवाड, सखेखोल आणि आसोली या सात गावांतील ग्रामस्थांनी ग्रामसभांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून मायनिंगला विरोध केला आहे. असे असताना प्रशासनाने जेएसडब्ल्यू कंपनीला परवानगी देताना ग्रामसभांच्या अधिकारांवर गदा आणली असल्याचा आरोप अमित सामंत यांनी केला.
मायनिंग सर्वेक्षणासाठी करण्यात आलेल्या ड्रोन सर्वेक्षणावेळी निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत बोलताना सामंत म्हणाले, “कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षातील बड्या पदाधिकाऱ्यांची नावे घेत ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. याबाबत सत्ताधारी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी.”
ग्रामस्थांच्या निर्णय प्रक्रियेला किंमत नसेल तर ग्रामसभांना दिलेल्या अधिकारांचे काय महत्त्व, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वीही अनेक वादग्रस्त प्रकल्प आणण्याचे प्रयत्न झाले असून भविष्यातही अशा प्रकल्पांना विरोध करण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मायनिंग सर्वेक्षणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांवर जेएसडब्ल्यू कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाने केली आहे. गुन्हे मागे न घेतल्यास पक्षाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अमित सामंत यांनी दिला.
“आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थांच्या न्याय्य लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खंबीरपणे सोबत राहील. मात्र विरोध करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततेच्या मार्गाने संघर्ष करावा,” असे आवाहनही त्यांनी केले.
