आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्य अभियंता रणजित हांडे पुढील आठवड्यात करणार दौरा..
⚡दोडामार्ग ता.१७-: आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच दोडामार्ग तालुक्याला भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला होता. यावेळी राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळ (MSIDC) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्ते कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता काही भागातील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कोल्हापूर-नागणवाडी-चंदगड-रामघाट-दोडामार्ग-असनोडा या राज्य मार्ग क्रमांक १८९ वरील किमी ०/१०० ते ३/०० या भागातील ईपीसी मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत आमदार केसरकर यांनी मुंबई येथे MSIDC चे मुख्य अभियंता श्री. रणजित हांडे यांची भेट घेऊन तक्रार मांडली.
रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यावर मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी पुढील आठवड्यात संबंधित भागाचा प्रत्यक्ष दौरा करून रस्ते कामाची पाहणी करण्यात येईल व तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, मुख्य अभियंता हांडे यांच्या दौऱ्याकडे दोडामार्गवासीयांचे लक्ष लागले असून निकृष्ट कामाबाबत संबंधितांवर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
