मालवणचे संत साहित्याचे गाढे अभ्यासक, संतचरित्रकार रवींद्र धामापूरकर यांचे निधन…

⚡मालवण ता.१२-:
मालवणचे संतचरित्रकार आणि मालवणच्या अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र दाजी धामापूरकर यांचे काल गुरुवारी रात्री वयाच्या ७९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज सकाळी धुरीवाडा येथील कासवकर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मालवण धुरीवाडा येथील रहिवासी आणि तळगावचे सुपुत्र रवींद्र दाजी धामापूरकर यांचा जन्म २९ एप्रिल १९४७ रोजी झाला. रवींद्र धामापूरकर यांनी अथक मेहनतीने शिक्षण घेत एम. ए. मराठी, एम. ए. हिंदी, बी. एड. अशा पदव्या संपादन केल्या. मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कुलमध्ये काही वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यानंतर मालवणच्या अ. शि. दे. टोपीवाला हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी स्वीकारली व त्याच हायस्कुलमधून ते सेवानिवृत्त झाले.

रवींद्र धामापूरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संतांविषयी अभ्यासपूर्ण लेखन केले. संत चरित्रकार म्हणून त्यांनी ख्याती मिळवली. त्यांनी १५ प्रसिद्ध, अप्रसिद्ध संतांचे रसाळ प्रासादिक चरित्र ग्रंथ, पारमार्थिक उपासना, साधने संबधी तत्व चिंतनात्मक ग्रंथ लिहिले. यामध्ये सत्पुरुषांच्या सहवासात, सूर्योपासना साधना आणि साक्षात्कार, दहा प्रभावी महामंत्र, श्री कैवल्याश्रम स्वामी महाराज (चरित्र आणि कार्य), श्रीविष्णुचैतन्य गणपतमहाराज (चरित्र आणि कार्य), महासाध्वी नाटेकर आजी, बिल्व-पत्र यासह विविध ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. अनेक साप्ताहिके, मासिके, वृत्तपत्र यामधून रवींद्र धामापूरकर यांनी विपुल लेखन केले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू असा परिवार आहे.

You cannot copy content of this page