झाराप रेल्वे स्टेशनवरून खनिज माती वाहतुकीवरून संशय…

अवैध मायनिंगची चौकशी करण्याची वैभव नाईक, परशुराम उपरकर व पर्यावरण कार्यकर्त्यांची मागणी :जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..

⚡सिंधुदुर्ग दि.१२-: झाराप रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या खनिज माती वाहतुकी संदर्भात व अवैध मायनिंग संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कुठल्याही शासकीय, प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला हा अवैध मायनिंग उद्योग शासनाचा महसूल बुडवून सुरू आहे का ? असा सवाल उपस्थित केला गेला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, सामाजिक, पर्यावरण कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, गेले दोन आठवडे कुडाळ तालुक्यातील झाराप रेल्वे स्टेशनवरून फार मोठ्या प्रमाणावर खनिज सदृश्य मातीची वाहतूक वास्को गोवा येथे होत आहे.
गेल्या दोन आठवड्यात दहा ते बारा रेल्वे ट्रेन भरून ही खनिज सदृश्य माती नेली जात आहे. दिवसाला पाचशे सहाशे डंपर्स भरून आणण्यात येणाऱ्या खनिज सदृश्य माती वाहतूकीमुळे झाराप येथील ग्रामस्थांना प्रदुषणाचा आणि अपघात होण्याच्या भयाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उपलब्ध माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील तळवणे, कोंडुरा येथून अवैधरित्या उत्खनन करून ही खनिजमाती आणली जात आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर ही खनिजमाती आणण्यात येत आहे तर तिथे कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता तसेच कुठल्याही प्रकारचा पर्यावरण आघात अहवाल, जनसुनावणी न घेता मायनिंग उद्योग सुरू झाला आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

तसेच कुठल्याही शासकीय प्रशासकीय परवानग्या न घेता होत असलेला हा अवैध मायनिंग उद्योग शासनाचा महसूल बुडवून सुरू आहे का ? असाही गंभीर प्रश्न उपस्थित केला गेला. दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी क्षेत्रात रात्रीच्या अंधारात होत असलेला खनिज सदृश्य मातीच्या चोरीचा प्रकार उघड झालेला आहेच. असे असताना झाराप रेल्वे स्टेशनवरून नेण्यात आलेली हजारो टन खनिज सदृश्य माती ही कोणाच्या आणि कुठल्या नियमांतर्गत नेण्यात आली ? हे कृपया जनतेला कळावे ही मागणी यावेळी करण्यात आली आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात जागोजागी होत असलेल्या बेकायदेशीर अवैध मायनिंग विरोधात कडक कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.

You cannot copy content of this page