५ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त: सावंतवाडी व कणकवलीतील दोघांवर गुन्हा दाखल..
⚡बांदा ता.१२-: बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी धडक कारवाई करत दोन दिवसांत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये वाहनांसह एकूण ५ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दि. ११ जून रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास बांदा पोलीस चेक नाक्यावर तपासणीदरम्यान नागेश आनंद चव्हाण (वय ४६, रा. ओसरगाव, ता. कणकवली) हा हिरो कंपनीच्या दुचाकीवरून गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या व दुचाकीसह एकूण ४९ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हवालदार विलास पांडुरंग भोगले यांच्या फिर्यादीवरून बांदा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७०/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार मुणगेकर करीत आहेत.
त्यानंतर दि. १२ जून रोजी पहाटे ५ वाजता त्याच चेक नाक्यावर करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत सुधीर खुबू राठोड (वय २८, रा. साहिलवाडा, ता. सावंतवाडी) हा टोयोटा ग्लान्झा कारमधून मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून मॅकडॉवेल्स नं. १, इम्पिरियल ब्ल्यू व गोल्डन एस व्हिस्कीच्या बाटल्यांसह कार असा एकूण ४ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ७१/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला हवालदार माळकर करीत आहेत.
या दोन्ही कारवाया बांदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, सहाय्यक फौजदार गवस, हवालदार भोगले, पोलीस कर्मचारी पोवार, पाटील, सावंत व कापसे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडल्या.
