⚡बांदा ता.०५-: जल, जंगल आणि जमीन या विषयांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ‘राखणदार’ पदयात्रा येत्या १३ जून २०२६ पासून सुरू होणार आहे. या पदयात्रेचा पहिला टप्पा गोवा-वेंगुर्ला मार्गावर पार पडणार असून, खानापूर तालुक्यातील कणकुंबी श्री माऊली देवी मंदिरापासून ते सोनुर्लीतील श्री माऊली देवी मंदिरापर्यंत हा प्रवास होणार आहे.
पर्यावरण संवर्धन, वनसंपत्तीचे जतन, जलस्रोतांचे संरक्षण तसेच स्थानिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. ‘जल, जंगल आणि जमीन’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून विविध गावांतील नागरिकांना या अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे.
पदयात्रेचा मार्ग होजणे केरी, विर्डी, कारापूर, डिचोली, दोडामार्ग, कळणे, कोलझर, तळकट, झोळंबे, तांबोळी, डेगवे, बांदा मार्गे सोनुर्लीत पोहचणार आहे. या मार्गावरील विविध देवस्थानांमध्ये तसेच गावांमध्ये पदयात्रेचे स्वागत आणि संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमात पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पर्यावरणप्रेमी व पदयात्रा आयोजक प्रसाद गवडे यांनी सांगितले की, “कोकणच्या माती, पाणी, जंगल, देवऱाई आणि पर्यावरणाच्या जीवनमूल्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प घेऊन ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. आपल्या भूमीशी असलेले नाते पुन्हा जागवणे, स्थानिक ज्ञान समजून घेणे आणि निसर्गरक्षणाचा संदेश घराघरांत पोहोचवणे हा या उपक्रमामागील हेतू आहे.”
. राखणदार पदयात्रेमुळे जल, जंगल आणि जमीन यांच्या संवर्धनासाठी सामूहिक जनचळवळ उभी राहण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
जल, जंगल आणि जमीन संवर्धनासाठी ‘राखणदार’ पदयात्रेची हाक…
