परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कणकवली बसस्थानकाला भेट…

नगरपंचायतीकडून अतिरिक्त जागेची मागणी..

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कणकवली बसस्थानकाला भेट देत बसस्थानक व परिसराची पाहणी केली. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ, शाल व फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले.

या भेटीदरम्यान नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, वैभव मालंडकर, सुजित जाधव, संतोष पुजारी, सौरभ पारकर, निकीत मुरकर, अमेय पारकर, उमेश आरोलकर, प्रशांत अंधारी, संजय पारकर यांच्यासह विभाग नियंत्रक दीपक घोडे, विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख, विभागीय यंत्र अभियंता सुजित डोंगरे, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड तसेच विभागीय व आगार पातळीवरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन सादर करून कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली मोकळी जागा नगरपंचायतीला व्यापारी तत्त्वावर वापरण्यास देण्यात यावी, अशी विनंतीही करण्यात आली.

निवेदनात नमूद केल्यानुसार, या जागेचा नियोजनबद्ध विकास करून व्यापारी संकुल उभारल्यास नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. तसेच बसस्थानक परिसराचे सुशोभीकरण, नागरिकांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना देणे शक्य होणार आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून जागेबाबत माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच या मागणीबाबत सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page