चुकीला कोणालाही पाठीशी घालणार नाही: पालकमंत्री नितेश राणे..
⚡कणकवली ता.३१-: माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप अयोग्य असून अशा वक्तव्यांमुळे सरकारच्या कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
राणे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावी काम केले आहे. राज्यातील गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण झाली असून कोणताही गुन्हा केल्यानंतर सुटका होणार नाही, अशी भावना निर्माण करण्यात सरकार यशस्वी ठरले आहे.
गृह खात्यातील काही अधिकारी चुकीचे काम करत असतील, तरी त्या प्रत्येक बाबीवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे बारकाईने लक्ष असते. मंत्री आणि आमदार म्हणून काम करताना अनेकदा भ्रष्ट किंवा निकृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करताना, त्यांना निलंबित करताना आम्ही स्वतः पाहिले आणि अनुभवले आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमदार निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांबाबत केलेल्या आरोपांची माहिती सरकारपर्यंत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्यात येईल. चौकशीत कुठेही चूक आढळल्यास संबंधितांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. सरकार म्हणून चुकीला कोणालाही पाठीशी घालण्याची भूमिका नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही गुन्हेगाराला कधीही संरक्षण दिलेले नाही. भ्रष्टाचारमुक्त, ड्रग्जमुक्त, गांजामुक्त आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी ते दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांना गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये, असा सज्जड इशारा माजी आमदार वैभव नाईक यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
