मोती तलावाचा कचरा प्रश्न सुटला; ॲड. सायली दुभाषी यांच्या मागणीला यश…

⚡सावंतवाडी ता.३०-:
सावंतवाडी शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या मोती तलाव परिसरातील अस्वच्छतेचा आणि कचरा तुंबण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शिवसेनेच्या नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी जानेवारी मध्ये झालेल्या पहिल्याच पालिकेच्या मासिक सभेत हा मुद्दा उचलून धरत तो आक्रमकपणे मांडला होता. त्यानंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, शहरात ठिकठिकाणी अत्याधुनिक आणि आकर्षक कचरा कुंड्या बसवण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. यामुळे मोती तलावाच्या फूटपाथवर आणि रस्त्यावर पसरणाऱ्या कचऱ्याला आता पूर्णपणे चाप बसणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
​मोती तलावाच्या काठावर मोठ्या प्रमाणावर हॉटेल्स, खाऊगल्ल्या आणि आईस्क्रीम पार्लर्स आहेत. या दुकानांमधून निघणारा ओला कचरा जुन्या कचरा कुंड्यांमध्ये मावत नव्हता. परिणामी, हा कचरा बाहेर पडून भटक्या कुत्र्यांमुळे तो फूटपाथ आणि रस्त्यावर सर्वत्र पसरत असे. यामुळे सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी येणाऱ्या नागरिकांना तीव्र दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लक्ष वेधण्यात आले होते.
​या पार्श्वभूमीवर, नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या पालिकेच्या पहिल्याच मासिक सभेत हा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे लावून धरला होता. “शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्या जुन्या कचरा कुंड्या तात्काळ बदलून त्या ठिकाणी अत्याधुनिक व आकर्षक कुंड्या बसवाव्यात,” अशी आग्रही मागणी त्यांनी सभागृहात केली होती.
​ॲड. दुभाषी यांनी सभागृहात आवाज उठवल्यानंतर प्रशासनानेही या विषयाची गंभीर दखल घेतली. अखेर शहरात ठिकठिकाणी या नव्या अत्याधुनिक कुंड्या बसवण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या सजगतेमुळे आणि प्रशासनाच्या त्वरित कारवाईमुळे हा प्रश्न सुटल्याने ॲड. सायली दुभाषी यांच्यासह नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या नव्या कुंड्यांमुळे परिसर स्वच्छ राहण्यास मोठी मदत होणार असून सावंतवाडीकरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

You cannot copy content of this page