तारामुंबरी खाडीत पोहताना देवगडातील नागरिकाचा बुडून मृत्यू…

आठ दिवसांत दुसरी दुर्घटना; खाडी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर..

⚡देवगड ता.३०-: देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील खाडीच्या मुखाशी एका नागरिकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. संबंधित व्यक्ती पोहण्यासाठी खाडीत उतरली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत व्यक्तीचे नाव अनिल गणपत मुणगेकर (वय ५५, रा. देवगड शहर) असे आहे. ते खाडीत पोहत असताना अचानक बुडाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. त्यांना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमागे पोहत असताना अचानक फिट आली असावी किंवा अन्य काही वैद्यकीय कारण असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र नेमके कारण अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वी याच खाडी परिसरात आणखी एक दुर्दैवी घटना घडली होती. दादर (मुंबई) येथून पर्यटनासाठी आलेले चार मित्र पोहण्यासाठी खाडीत उतरले होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही अडचणीत सापडले होते. स्थानिकांच्या आणि बचाव पथकांच्या प्रयत्नांतून तिघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सलग आठ दिवसांच्या कालावधीत घडलेल्या या दोन घटनांमुळे तारामुंबरी खाडी परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरती-ओहोटी, पाण्याचा वेग आणि खोल भाग यांची पुरेशी माहिती नसताना नागरिक व पर्यटक पाण्यात उतरत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.या पार्श्वभूमीवर खाडी परिसरात धोकादायक ठिकाणी इशारा फलक उभारणे, सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे तसेच पर्यटक आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

You cannot copy content of this page