दांडेलीच्या अनिशा ची महाराष्ट्र पोलीस दलात निवड…

जिद्द,चिकाटी,मेहनतीच्या जोरावर अनिशाने, केलं आपलं स्वप्न साकार..

⚡आरोस ता.३०-:
दांडेली येथील सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या एका शेतकरी मुलीने जिद्द , चिकाटी आणि कठोर मेहतीने आपलं पोलीस होण्यास स्वप्न साकार करून इतरांसाठी एक आदर्श निर्माण केला.

शेतकरी कुटुंबातील मुलींनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे ही अभिमानाची बाब आहे. दांडेली येथील अनिशा पालयेकर या मुलीने तब्बल पाच वर्षे अथक मेहनत घेत ,मोठ्या जिद्दीने स्वतःला सिद्ध केले आहे. तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण दांडेली गावासाठी प्रेरणादायी असेच आहे.

आपल्या आई वडिलांची प्रेरणा , मराठा अकॅडमी चे शिक्षक यांचे मार्गदर्शन ,तिच्या भावाची साथ,आणि गावातील ग्रामस्थ, मित्र परिवार यांच्या आशीर्वादा मुळेच आपण इथ पर्यंत पोहचू शकल्याचे अनिशाने सांगितले.

यावेळी,ग्रामीण भागातील मुलींनी सुद्धा तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण व स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे प्रतिपादन दांडेली माजी सरपंच कृष्णा (दादा) पालयेकर यांनी केले.

दांडेली गावातील शेतकरी कुटुंबातील मुलगी अनिशा संजय पालयेकर हिने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुंबई शहर विभागात निवड मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
तिच्या या यशाबद्दल माजी सरपंच दादा पालयेकर ,गावातील ग्रामस्थांनी अनिशाचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अनिशाने पोलीस होण्याचे स्वप्न लहानपणापासूनच उराशी बाळगेले होते.पोलीस भरतीसाठी गेली पाच वर्षे तिने शारीरिक व लेखी परीक्षेची सातत्याने तयारी केली. अनेक अडचणींवर मात करत तिने आपले ध्येय गाठले. तिच्या यशामागे आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची जिद्द महत्त्वाची ठरली.

You cannot copy content of this page