आंबोलीत दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा उत्साहात संपन्न…

आंबोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आयोजन; दिव्यांगांच्या समस्या जाणून घेऊन निवारणाचे आश्वासन..

⚡आंबोली ता.३०-: सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल व महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आंबोली ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आंबोली विभागातील दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्यास आंबोलीच्या सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर, ग्रामपंचायत सदस्य दीपक नाटलेकर, ग्रामपंचायत अधिकारी एस. जी. गोसावी, राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघाचे अध्यक्ष बाबुराव गावडे, सौ. सविता गावडे, विनायक देसाई, संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे, संस्था कर्मचारी विशाखा कासले, प्रसन्ना शिर्के, ललित गावडे, पवित्रा शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हेलन कीलर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. संस्था कर्मचारी विशाखा कासले यांनी संस्थेचा अहवाल सादर केला.
संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करताना, “आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आहोत. या मेळाव्याचा लाभ घ्या,” असे आवाहन केले.
यावेळी सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनीही दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच इतर अडचणी संस्थेच्या माध्यमातून मांडून त्यांचे निवारण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात साईकृपा संस्थेच्या वतीने नेहा पटकारे व सिद्धी पडवळ यांना श्रवणयंत्र तर बाळकृष्ण गावडे यांना वॉकिंग स्टिक प्रदान करण्यात आली. तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
या मेळाव्यास ४० हून अधिक दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्था कर्मचारी सौ. शिर्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आंबोलीच्या सरपंच तथा प्रशासक सौ. सावित्री वामन पालेकर यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page