५० कोटींच्या पर्यटन आराखड्यावर डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टीका; ‘वर्ल्ड हेरिटेज वेट लॅंड’ मानांकनासाठी प्रयत्न करण्याची मागणी…
⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी शहराचा पर्यटन विकास निश्चितपणे व्हावा, मात्र तो करताना शहराचे ऐतिहासिक सौंदर्य आणि मोती तलावाचा वारसा अबाधित राखला गेला पाहिजे, अशी भूमिका डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी मांडली आहे. नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी जाहीर केलेल्या “मोती तलाव पर्यटन आराखडा” आणि त्यासाठी प्रस्तावित ५० कोटी रुपयांच्या निधीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे की, जवळपास दोनशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोती तलावाला धामापूर तलावाच्या धर्तीवर “वर्ल्ड हेरिटेज वेट लॅंड” मानांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. असे मानांकन मिळाल्यास सावंतवाडी शहराच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर ओळख मिळू शकते.
मोती तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर सुशोभीकरणाच्या नावाखाली काँक्रीटीकरण केल्यास तलावाच्या नैसर्गिक आणि ऐतिहासिक सौंदर्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. “टक्केवारीच्या जमान्यात विकास नेमका तलावाचा होणार की सत्ताधाऱ्यांचा?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली अनेक जलस्रोतांचे विद्रुपीकरण झाल्याची उदाहरणे असल्याचे सांगत, कालांतराने असे तलाव बुजवून त्या ठिकाणी इमारती, शॉपिंग मॉल आणि थिएटर उभे राहिल्याचे जनतेने पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
सावंतवाडीचा पर्यटन विकास करण्यासाठी शहरात अधिकाधिक होम स्टे प्रकल्प उभे राहणे गरजेचे असून शासनाने त्यासाठी आर्थिक सहाय्य द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच “शांत लेक टाऊन” म्हणून सावंतवाडीची ओळख महाराष्ट्रासह शेजारील राज्यांमध्ये प्रभावीपणे प्रसिद्ध केल्यास पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मोती तलाव हा सावंतवाडी शहराचा सौंदर्यबिंदू असून सुशोभीकरणाच्या नावाखाली त्याचे विद्रुपीकरण होऊ नये, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
