पुन्हा एकदा अधिकारी वर्ग भाजपच्या आंदोलनाच्या प्रतीक्षेत ? पप्पू परब….
⚡वेंगुर्ला ता.२८-: वेंगुर्ला तालुक्यात ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने उष्णतेमुळे हैराण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी वीज वितरणच्या कारभाराबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात तर कोणतीही पूर्वकल्पना न देता अगदी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने तालुकावासियांतून संताप व्यक्त होत आहेत. नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यानंतर वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे वेंगुर्ला तालुका भाजपा शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ” कार्यालयात उपस्थित नसलेल्या अधिकाऱ्यांची ” कानउघाडणी केली होती व मान्सूनपूर्वी सेवा न सुधारल्यास मुख्य कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. परंतु पुन्हा काही दिवस लोटले तरी तालुक्यात बऱ्याच गावात वारंवार विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे व स्थिती जैसे थे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपा शिवसेना पक्ष पदाधिकारी यांच्या सूचनांचे पालन अधिकाऱ्यांमार्फत होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी स्पष्ट निर्देश देऊनही कायम “दिवा ट्रेन ” प्रमाणेच सेवा दिली जात आहे. त्यामुळे अधिकारी वर्ग यांना ग्रामीण भागातील जनतेचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे जाणवत आहे.त्यामुळे तालुक्यातील जबाबदार अधिकारी यांनी मान्सूनच्या आगमनास आणखी 8 ते 10 दिवसांचा अबधी असून हलगर्जीपणा न करता मेंटेनन्सची अपूर्ण कामे परिपूर्ण करावीत, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केले आहे. शहरातही विविध छोटे मोठे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांचे विजपुरवठा खंडित राहून नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे श्री. परब यांनी बोलताना स्पष्ट केले.
