सॉफ्टवेअरमध्ये केलेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचे दाखले अडकले…

विद्यार्थ्यांना आरक्षणातून प्रवेश घेण्याचा मार्ग झाला कठीण…

⚡कुडाळ ता.२७-: विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांच्या सॉफ्टवेअर मध्ये अचानक बदल केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे दाखले अडकले आहेत. या सॉफ्टवेअरमुळे आरक्षणातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे हे दाखले तात्काळ मिळावेत अशी मागणी पालकांमधून होत आहे.
दहावी व बारावी इयत्तांचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लागणाऱ्या दाखल्यांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी तहसील कार्यालय येथे असलेल्या महा ऑनलाइन सेवेच्या ठिकाणी जाऊन प्रवेशासाठी आवश्यक असणारे दाखले काढण्याची ही प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी महाऑनलाईन सेवेकडून अचानक सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे दाखले अडकले आहेत. दाखल्यांसाठी धावपळ करणाऱ्या या विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची दाट शक्यता आहे.या सॉफ्टवेअर मध्ये अचानक बदल का केले गेले याचे उत्तर कोणाजवळ नाही. पण या सॉफ्टवेअरमुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे.
दाखले काढण्यासाठी कमीत कमी ११ कागदपत्रे लागतात आणि हे कागदपत्रे जमवण्यासाठी पालक व विद्यार्थी धावपळ करतात. आता बदल झालेल्या सॉफ्टवेअरमध्ये फक्त तीन कागदपत्रे घेतले जातात. आणि त्या कागदपत्रांवर एखादा दाखला कशाप्रकारे द्यावा हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे हे दाखले देण्यासाठी अधिकारी सह्या करत नाहीत. विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे जर हे दाखले वेळीच मिळाले नाहीत तर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार आहे. त्यामुळे शासनाने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात दाखला मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या जाणाऱ्या पावतीवर त्या विद्यार्थ्यांना आरक्षणातील जागा मिळाव्यात अशा प्रकारची मागणी पालकांमधून होत आहे अचानक बदललेल्या सॉफ्टवेअरमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

You cannot copy content of this page