आडेलीसाठी पुन्हा व्ही. जी. सावंत ‘ग्रामसेवक’ देण्याची अजय गडेकर यांची मागणी..
⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातील
आडेली खुटवळवाडी ते झाराप मार्गांनजिक असलेल्या समस्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे.तसेच आडेली ते वजराट तिठा या एरियातील समस्याकडे सा. बां. विभागाचेही मोठे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात आली आहे. आडेली खूटवळवाडी शाळा ते झाराप कडे जाणाऱ्या रस्ता दुतरफा वाढलेली झाडी कटिंग बाबत संबंधित विभागास ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आडेली पोस्ट स्टॉप येथे मुख्य मार्गांवर धोकादायक वळणावर अपघात होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याबाबत सा. बां. विभागास ग्रामपंचायतीने पत्र देऊनही गतिरोधक मागणीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
आडेली पोस्ट थांबा वळणावर व आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र नजिक दोन “धोकादायक खड्डे” बुझवीण्याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले असून अपघाताची शक्यता आहे. आडेली पीएचसीचा समोरील एरियातील कठड्याचा काही भाग कोसळला असून आकेशियाची झाडे मुख्य रस्त्यावर लोम्बकळत आहेत व पावसात हीच झाडे एखाद्या वाहनावर पडून ‘जीवितहानी’ होऊ शकते, इतकी “गंभीर” परिस्थिती आहे. आडेली कौल फॅक्टरीनजिक मुख्य रस्त्यानजिक साईडपट्टीवर धोकादायक दगड ठेवण्यात आले असून रात्रीच्या वेळी धूमस्टाईल दुचाकीस्वारांना धोकादायक व जीवघेणे ठरु शकतात, अशी स्थिती आहे. संबंधित ग्रामपंचायतला जुमानत नसल्याचे स्पष्ट होत असून याकडे आडेली ग्रामपंचायतचे दुर्लक्ष का? असा सवाल वाहनधारकांतून व्यक्त करण्यात आला आहे. याच मार्गांवरून श्री देव सोमेश्वर मंदिर मार्गे एस. टी. ची एक फेरी सुरु असून अगदी या दगडामुळे दुचाकीस्वार, पादचारी, शेतकरी अडचणीत येत आहेत. आडेली पीएचसित जाणाऱ्या महिला, आडेलीत धान्य दुकानावर येणारे ग्रामस्थ, दूध संकलन केंद्रावर दूध घेऊन जाणारे युवक यांना यामुळे धोका संभवत आहे. पावसाळ्यात वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मार्गांवर झाडे पडून वाहतूक ठप्प झाल्यास वाहतूक श्री देव सोमेश्वर मंदिर मार्गे वळविण्यात येते. हा मार्ग अरुंद असल्याने याचा फटका “आडेली गावातील नागरिकांना” दरवर्षी सहन करावा लागतो. दोन्ही “धोकादायक खड्ड्याबाबत” व “धोकादायक दगडाबाबत” भाजपच्या माजी ग्रामपंचायत सदस्याला कल्पना देऊनही “सर्व बाबतीत लक्ष देणे शक्य होत नसल्याचे” त्यांनी सांगितले आहे, त्यामुळे एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान आडेली सरपंचा यशस्वी कोंडसकर यांनी आपल्या कार्यकालात बरीच विकासकामे राबवून चांगले काम केले आहे. मागील सुमारे वीस वर्षात येथे कार्यरत सर्वच ग्रामसेवकांनी चांगले काम केले आहे. परंतु सध्या विविध समस्या पुन्हा उभ्या ठाकल्याने “आडेली गावाच्या विकासात” बाधा पोहचत आहेत.माजी शालेय
शिक्षणमंत्री व आमदार दिपक केसरकर यांनी आडेली गावासाठी चांगला निधी उपलब्ध करून दिला आहे. असे असूनही तत्पर “ग्रामविकास अधिकारी” नसल्याने
तालुक्यात शासन स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात आडेली ग्रामपंचायत काहीशी मागे राहत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आडेली ग्रामसेवक / ग्रामपंचायत अधिकारी म्हणून चांगले काम केलेल्या ग्रामसेवक व्ही. जी. सावंत यांना “आडेली ग्रामपंचायत अधिकारी” म्हणून पुन्हा नेमणूक देण्यात यावी, अशी मागणी पत्रकार अजय गडेकर यांनी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे व उपसभापती सचिन देसाई यांच्याकडे व शासनाकडे केली आहे.
