अज्ञात वाहन चालक अपघात घडवून पसार..
⚡सावंतवाडी ता.२६-: आज मध्यरात्री अडीच च्या सुमारास मळेवाड वरून सावंतवाडी च्या दिशेने जाणारे एका अवजड वाहनाने वरची मळेवाड येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक करमळकर यांच्या घराशेजारील भली मोठी काजूच्या झाडाची फांदी तोडत थेट विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहिन्या तोडत विद्युत पोल जमीनदोस्त केला. या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या भल्या मोठ्या काजूच्या झाडाची फांदी तसेच विद्युत पोल तुटल्यामुळे मोठा आवाज झाला.या आवाजामुळे येथील घर मालक दीपक करमळकर जागे होत प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेत समोरील प्रसंग पाहून विद्युत पुरवठा विभागाला संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी घटनेची माहिती दिली.
यावेळी मात्र सदरील अज्ञात अवजड वाहनचालक तेथून पसार झाला होता.
यावेळी तेथूनच कामानिमित्त जाणारा दुचाकी स्वार या अपघातातून थोडक्यात बचावला.या दुचाकी स्वाराला तेथील ग्रामस्थांनी उपचारासाठी दवाखान्यात पाठविले.मात्र या अपघातात दुचाकीचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
मध्यरात्रीची घटना असल्याने आणि रस्त्यावरच भली मोठी काजूच्या झाडाची फांदी व विद्युत पुरवठा करणारा पोल पडल्याने दोन्ही बाजूच्या जवळ जवळ एक किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.श्री करमळकर यांनी यावेळी ग्रामस्थांना बोलावून सदरील झाड,पोल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
ग्रामस्थांकडून या वेळी नाराजी व्यक्त करण्यात आली. कारण अशी रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना संबंधित विभागाला याची अगोदर कल्पना देणे गरजेचे असते.मात्र हे वाहनचालक वाहतूक करताना कोणतेही नियम न पाळता सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करून पसार होतात.
त्यामुळे संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
