अभय मालवणकर यांची मागणी:बांधकाम विभागाकडे निवेदन केले सादर..
⚡सावंतवाडी ता.२५-: बांदा-दाणोली हा रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर यांनी बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यातील बांदा-दाणोली हा महत्त्वाचा मार्ग असून गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र अद्यापही काम पूर्णत्वास गेलेले नाही. विशेषतः सरमळे ते विलवडे परिसरातील नाल्याजवळ रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आलेले नसल्याने त्या ठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.सदर रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे दुचाकी चालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थ व वाहनचालकांच्या समवेत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
