पोहण्यासाठी उतरलेल्या युवकांपैकी एक बेपत्ता; तिघांना स्थानिकांनी दिले जीवदान:
सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मुंबईहून आलेल्या मित्रांवर काळाचा घाला..
⚡देवगड ता.२४-:
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी रविवारी सायंकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत पोहण्यासाठी समुद्रात उतरलेल्या पाच युवकांपैकी एक युवक बुडाला असून तिघांना स्थानिक मच्छिमारांनी धाडसाने वाचविले. चैतन्य राजेंद्र गुरव (२२, मुळ रा. दादर-नायगाव) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. तर सोहम जयेश मंडोद (२०, मुळ रा. दादर-नायगाव) याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुळ देवगड तालुक्यातील ब्राम्हणदेववाडी येथील रहिवासी असलेला यश राजेंद्र उपरकर (२१) हा सध्या दादर-नायगाव येथे वास्तव्यास आहे. सुट्टीसाठी त्याचे मित्र ओम दीपक चव्हाण (१७), चैतन्य गुरव, सोहम मंडोद आणि अर्णव राजेश तारी (२०) हे देवगड येथे आले होते. रविवारी सायंकाळी हे सर्वजण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. यावेळी यश उपरकर हा किनाऱ्यावरच थांबला होता, तर उर्वरित चौघेजण समुद्रात पोहण्यासाठी उतरले.
समुद्रातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने काही क्षणातच चौघेही युवक बुडू लागले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक रमेश मनोहर तारी, लक्ष्मण मनोहर तारी, मनीष रमेश तारी, बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. बाबुराव धुरी आणि बाळा राजम यांनी नौकेच्या सहाय्याने समुद्रात जाऊन बुडणाऱ्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
स्थानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे ओम चव्हाण, सोहम मंडोद आणि अर्णव तारी यांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात यश आले. यातील सोहम मंडोद हा बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला तातडीने कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात आला. त्यानंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
मात्र या धावपळीत चैतन्य गुरव हा समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाला. त्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक मच्छिमारांनी नौकांच्या सहाय्याने समुद्रात शोधमोहीम सुरू केली होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा ठावठिकाणा लागला नव्हता.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष भालेराव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सावंत, पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. घटनेची वार्ता परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी समुद्रकिनाऱ्याकडे धाव घेतली होती.
“समुद्रात जाऊ नका” म्हणत होतो; तरीही मित्रांचा हट्ट
या घटनेबाबत यश उपरकर यांनी सांगितले की, “सुट्टी एन्जॉय करण्यासाठी माझे मुंबईतील मित्र देवगडला आले होते. आम्ही सर्वजण मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेलो होतो. मित्रांना समुद्रात जाऊ नका, असे मी वारंवार सांगत होतो. मात्र त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उतरण्याचा हट्ट केला आणि काही क्षणातच ही दुर्दैवी घटना घडली. चैतन्य गुरव याला चांगले पोहता येत होते, तरीही तो समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाला,” असे त्यांनी सांगितले.
समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत
सध्या पर्यटन हंगामामुळे देवगड तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारीही घटनेवेळी पर्यटकांची मोठी उपस्थिती होती. युवक बुडत असताना अनेक पर्यटक केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले. मात्र स्थानिक मच्छिमारांनी वेळेत धाडस दाखवून मदतकार्य राबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
विशेष म्हणजे, या गर्दीच्या समुद्रकिनारी कोणतेही सुरक्षारक्षक तैनात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
