तौक्ते नुकसानी गणपती पूर्वी न मिळाल्यास मनसे आंदोलन करणार

प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ती चक्रीवादळाने केलेल्या नुकसान भरापाईपोटी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्ह्यासाठी ४० कोटीचं पॕकेज जाहिर केलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकसानग्रस्त भागाच्या पूनर्वसनासाठी २५२ कोटीचे पॕकेज जाहिर केले. आता हे पॕकेज नेमकं कसं मिळणार आणि कधी मिळणार याविषयी पालकमंत्र्यांनी सविस्तर सांगावं. हे नुकसान भरपाईचं पॕकेज चतुर्थीआधी जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्तांना मिळालं नाही, तर मनसे कोरोनाचे सर्व नियम पाळून रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे. आतापर्यंत साऱ्याच सत्ताधाऱ्यांनी जनतेला फसवलं. निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळालेली नाही. तौक्ती वादळाने जिल्ह्याचं भयंकर नुकसान झालंय. पालकमंत्र्यांनी ४० कोटीचं पॕकेज जिल्ह्यासाठी जाहिर केलं. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी भूमीगत केबल, धुपप्रतिबंध बंधारे, किनारपट्टीवर बहुउद्देशीय निवारा केंद्रे इ. साठी २५२ कोटीचं पॕकेज जाहिर केलं. यातलं नेमकं किती सिंधुदुर्गच्या वाट्याला येणार आहे, याचं उत्तर उद्या दि. २९ मे रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या पालकमंत्र्यांनी द्यावं, असे उपरकर म्हणाले. भूमीगत बंधारे, केबल यांचं आश्वासन प्रत्येक लोकप्रतिनिधी निवडणूकीवेळी देतो. परंतु ते आश्वासन कधीच पूर्ण केलं जात नाही. जिल्ह्याच्या नुकसानीच्या निर्णयाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले गेलेत. परंतु एवढी मोठमोठी पॕकेज जाहिर करूनही पुनःपुन्हा पॕकेज का जाहिरा करावी लागतात? या पॕकेजचं नेमकं होतं काय? असा सवाल उपरकर यांनी केला आहे. तौक्ती वादळाच्या पार्श्वभूमीवर मिळणारं नुकसान भरपाई पॕकेज हे आरोग्य यंत्रणेसारखं फसवं असू नये. तसेच हे पॕकेज गणेश चतुर्थीपूर्वी मिळणं आवश्यक आहे. असं झालं नाही तर मनसे नुकसानग्रस्तांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page