४ व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी १० हजार दंड वसूल तर दोन व्यापाऱ्यांनी दंड न भरल्याने गुन्हा दाखल*
*💫कणकवली दि.२८-:* अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने उघडून कोव्हीड नियमांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कणकवली बाजारपेठेतील चौघा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 10 हजार प्रमाणे 40 हजार दंड वसुली आणि अन्य दोन व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार रमेश पवार, पोलिस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे, एपीआय सागर खंडागळे यांच्या धडक कारवाईने नियमभंग करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडकी भरली आहे. महसूल ,नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाने आज सकाळी ही धडक कारवाई केली. 2 मोबाईल शॉपी, 1 घड्याळ दुकान आणि एका सुवर्णपेढी वर प्रत्येकी 10 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून दंड वसुली करण्यात आली. तर मुख्य बजारपेठेतीलच दोन कापड दुकानंदारांवर ही प्रत्येकी 10 हजार दंडाची कारवाई करण्यात आली. मात्र दंड न भरल्याने त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिली. वारंवार सूचना देऊनही बाजारपेठेत अत्यावश्यक सेवेत नसणारी दुकाने उघडी असतात. त्यामुळे साहजिकच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते. कोव्हीड पॉझिटिव्हीटी रेट नुसार सिंधुदुर्ग जिल्हा रेड झोनमध्ये आहे. आणि त्यातही महाराष्ट्रात 7 व्या क्रमांकावर सिंधुदुर्ग आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कडक धोरण अवलंबले असून जो नियम मोडेल त्याच्यावर धडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. कणकवली शहरात 27 मे रोजी 20 हुन अधिक कोव्हीड रुग्ण सापडले. कणकवली शहरात सरासरी कोव्हीड चे 15 रुग्ण दरदिवशी सापडत आहेत. तरीही बाजारपेठेतील गर्दी काही आटोक्यात येत नाही आहे. जसे अत्यावश्यक नसणारी दुकाने उघडी आहेत तसेच अनावश्यक फिरणारेही काही नागरिक आहेत. अशा अनावश्यक फिरणाऱ्याना पटवर्धन चौकात सक्तीच्या रॅपिड टेस्ट ला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यांच्यावर भादवि 188 नुसार गुन्हेही दाखल केले जात आहेत. आजच्या कारवाईत नगरपंचायत चे मनोज धुमाळे, रवी म्हाडेश्वर, संतोष राणे, रमेश कदम, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
