मंदार शिरसाट यांचा पुढाकार..
कुडाळ : शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘शिव आपात सेना’ कार्यरत करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून, एका फोनवर शिवसैनिक मदतीसाठी धावून जाणार असल्याची माहिती मंदार शिरसाट यांनी दिली.
शुक्रवारी कुडाळ येथील शिवसेना शाखेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, संतोष शिरसाट, अतुल बंगे, सुशील चिंदरकर, शेखर गावडे, संदीप म्हाडेश्वर, विनोद शिरसाट, नीनी पाटणकर, शैलेश काळप आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
मंदार शिरसाट म्हणाले, अतिवृष्टी, झाडे पडणे, पूरस्थिती किंवा इतर आपत्तीच्या प्रसंगी शिव आपात सेनेची टीम तत्काळ मदतकार्य करणार आहे. यासाठी जेसीबी, बोट, रोप, सॉ कटर आदी साहित्य सज्ज ठेवण्यात आले असून, ५० शिवसैनिकांची टीम कार्यरत राहणार आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे, विषारी साप पकडण्यासाठी सर्पमित्रांची मदत तसेच वृद्ध आणि दिव्यांगांना औषध पुरवठा करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत ९४०५८१२१२१ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले. अमरसेन सावंत व अतुल बंगे यांनीही मंदार शिरसाट यांची संकल्पना चांगली असून, आपत्कालीन परिस्थितीत सरकारी यंत्रणा पोचण्यापूर्वी शिव आपात सेनेची टीम पोचून मदत करणार असल्याचे सांगितले.
