खासकील वाड्यात मध्यरात्री एमएनजीएलची बेदरकार खोदाई…

पाणीपुरवठा पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया: नगरसेवक संजू परब, अशी सुभेदार यांची घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना धरले धारेवर…

सावंतवाडी, दि-०२:- सावंतवाडी शहरातील खसकीलवाडा–शिल्पाग्राम परिसरात मध्यरात्रीनंतर घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एमएनजीएल कंपनीकडून रात्री उशिरा सुमारे १२ नंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता खोदाई करण्यात आली. या बेदरकार कामामुळे नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनला तडा जाऊन हजारो लिटर पाणी वाया गेले. ही घटना ऐन उन्हाळ्यात, शहरात पाणीटंचाई असताना घडल्याने नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.
घटनेची माहिती मिळताच ठाकरे युवासेनेचे तालुकाप्रमुख आशिष सुभेदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनी नगरपालिकेकडे विचारणा केली असता, “या कामाबाबत कोणतीही पूर्वकल्पना नव्हती,” असा धक्कादायक खुलासा प्रशासनाने केला.
दरम्यान, सुभेदार यांच्या पाठपुराव्यानंतर स्थानिक माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनीही घटनास्थळी भेट देत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी सुभेदार यांनी एमएनजीएल कंपनीला इशारा देताना, “यापुढे अशा प्रकारे रात्री अपरात्री बेकायदेशीर काम केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्याच खड्ड्यात रात्र दाखवू,” असा संतप्त इशारा दिला.
एमएनजीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे “नगरपालिका प्रशासन नेमके काय करते? आणि अशा बेजबाबदार ठेकेदारांवर नियंत्रण कोणाचे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
सदर रस्ता शहरातील मुख्य मार्ग असून येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. त्यामुळे अशा प्रकारच्या अनधिकृत आणि निष्काळजी कामामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

You cannot copy content of this page