रेवंडी ग्रामस्थांची आम. निलेश राणेंकडे मागणी..
⚡मालवण ता.२४-: कालावल रेवंडी खाडीपात्रात सर्जेकोट बंदर ते शेलटी जेटी दरम्यान साचलेला वाळू सदृश्य गाळ काढण्यासाठीची लिलाव प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर याच मागणीबाबत रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करत शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात उपोषणासारखे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही दिला आहे.
रेवंडी ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रेवंडीच्या उपसरपंच श्रद्धा वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना शाखाप्रमुख विराज तळाशीलकर, सदस्य मेघना कांबळी संतोष कांबळी प्रिया कांबळी प्राजक्ता कांबळी माजी सरपंच युवराज कांबळी व भावेश कांबळी विकास चेंदवणकर पांडुरंग कांबळी सुधीर कांबळी संजय कांबळी अनिरुद्ध पोयरेकर अनील वराडकर प्रतीक वेंगुर्लेकर साई वेंगुर्लेकर प्रमोद कांबळी बंटी तळाशीलकर संतोष मुणगेकर व गावातील पन्नास ते साठ ग्रामस्थ उपस्थित होते.
सह्याद्री पर्वतातून उगम पावणारी गडनदी ‘कालावल खाडी’ म्हणून ओळखली जाते. मात्र, डोंगरावरील जंगलतोडीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात माती आणि वाळू सदृश्य गाळ वाहून येत आहे. रेवंडी हा भाग खाडीच्या उताऱ्याचा शेवटचा टप्पा असल्याने रेवंडी गावासमोरील किनाऱ्यावर या गाळाचे डोंगर साचले आहेत. ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केल्यानुसार, खाडीपात्र उथळ झाल्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. यात भरतीचे खारे पाणी लगतच्या दुपीकी शेतजमिनीत घुसल्याने जमिनी नापीक होत आहेत. जमिनीतील खारटपणामुळे गावातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही आता खारट होऊ लागल्या आहेत. खाडीपात्र उथळ झाल्याने पावसाळ्यात पुराचे प्रमाण वाढले असून खाडीकाठची जमीन मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. गाळ साचल्यामुळे स्थानिक मच्छिमार आणि व्यावसायिकांना नौका नेणे कठीण झाले आहे, असे रेवंडी ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे.
शासनाकडून सदर सर्जेकोट बंदर पर्यंत शेलटी जेटी पर्यंत रीतसर सर्वे पूर्ण झाला असून या पट्ट्या मध्ये लिलाव प्रक्रिया राबविण्यास विलंब होताना दिसत आहे. तरी संबंधित सर्वे केलेल्या विभागा कडून सर्वे अहवाल तातडीने मागवून डूबी हातपाटी पद्धतीने वाळू सदृश्य गाळ उपसा करण्या करिता लिलाव प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. त्याचा फायदा स्थानिक गरजू बेरोजगार व्यावसायिक युवकांना होऊन शासनाच्या विकास कामांना फायदा होईल. तसेच शासनाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. परंतु काही समाज कंटकांकडून या उपक्रमा संदर्भात शासन स्तरावर खोट्या तक्रारी करून व न्यायालयामध्ये जाऊन शासनाची व लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत चुकीच्या पद्धतीने कथन करून या उपक्रमास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लिलाव प्रकिया थांबलेली आहे. पर्यायाने शासनाच्या महसूल बुडवून प्रामाणिक बेरोजगार युवकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे एकतर्फी न्याय न होता सर्वाना न्याय देऊन आपल्या स्तरावरून कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी आम. निलेश राणे यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून कालावल खाडी पात्रामधील मालडी ते सर्जेकोट बंदर पर्यंत वाहत आलेला बेसुमार वाळू सदृश्य गाळ रेवंडी किनारी साचल्यामुळे भविष्यात उत्तरांचल सारखी परिस्थिती होऊ नये म्हणुन शासनाने कायदेशीर योग्य ती कार्यवाही करून गाळ उपसा लिलाव प्रकिया लवकरात लवकर राबवावी अशी मागणीही रेवंडी ग्रामस्थांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन; आंदोलनाचा इशारा
याबाबत रेवंडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. यावेळी रेवंडी सरपंच अमोल वस्त, माजी सभापती सोनाली कोदे, उपसरपंच श्रद्धा वेंगुर्लेकर, ग्रामपंचायत सदस्य विराज तळाशीलकर, संतोष कांबळी, मेघना कांबळी, माजी सरपंच युवराज कांबळी, शैलेश कांबळी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित विभागाकडून सर्व्हे अहवाल मागवून घेऊन ‘डुबी हातपाटी’ पद्धतीने गाळ उपसा करण्यासाठी लिलाव प्रक्रिया तातडीने सुरू करावी. भविष्यात उत्तरांचलसारखी नैसर्गिक आपत्ती ओढवू नये, यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे, अशा मागण्या करत प्रशासनाने यावर लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रेवंडीवासीयांनी दिला आहे.
