केवळ शासकीय योजना राबविण्यावर आ नाईकांचा भर

वर्षभरात सेवासुविधा निर्माण करणे होते गरजेचे;भाजपच्या दत्ता सामंत यांचा आरोप

मालवण दि प्रतिनिधी मालवणात २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर आमदार वैभव नाईक उभारत असून ते शासनाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे. गेले वर्षभर कोरोना महामारी असताना येथील प्रथम नागरिक म्हणून आम. नाईक यांनी यापूर्वीच कोविड सेंटर उभारले पाहिजे होते. मात्र आमदार शासकीय कार्यप्रणालीतच अडकून राहिले. कोरोनामुळे आज जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला असून आमदारांनी शासकीय घोडे नाचविण्यापेक्षा कायद्याच्या चौकटीत न राहता तातडीने सेवासुविधा उपलब्ध कराव्यात असा सल्ला भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी आमदार नाईक यांना पत्रकार परिषदेतून दिला आहे. सध्याच्या कोरोना महामारीत रुग्णांसाठी तसेच आरोग्य यंत्रणेसाठी स्व:खर्चातून सेवा सुविधा उपलब्ध करून देणारे भाजप नेते दत्ता सामंत यांनी आज कुंभारमाठ येथील कोविड केअर सेंटरला जम्बो ऑक्सिजन सिलिंडर, एक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशीन तसेच मास्क व पीपीई किट्स प्रदान केली. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत दत्ता सामंत हे बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पाटकर, युवा कार्यकर्ते मंदार लुडबे, अभय कदम, राजू बिडये, संदीप भोजने, बाबू धुरी, बाबू गावकर, बाबू कासवकर आदी व इतर उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री दत्ता सामंत म्हणाले, कोरोनामुळे जनतेला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. अशावेळी विकासकामे बाजूला ठेवून आरोग्य विषयक कामे शासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून तातडीने झाली पाहिजेत. सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी निवडणुका व इतर कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठा खर्च करत असतात. हाच पैसा अजच्युअ संकट काळात खर्च करणे महत्वाचे आहे. सर्व पक्षीय मंडळींनी एकत्र येऊन एखादे कोविड सेंटर उभारले तर अनेक प्रश्न सुटतील. आपणही सामाजिक बांधिलकी जपत आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत कोरोना रुग्णांना व आरोग्य यंत्रणेला करत आहोत, यापुढेही जेवढी मदत करता येईल ती आपण करत राहू, या कार्यात आपल्याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीपाद पाटील यांचेही चांगले सहकार्य लाभत आहे, असेही दत्ता सामंत म्हणाले. आज गावागावातील सर्दी, ताप, खोकला असलेले लोक खासगी डॉक्टर व मेडिकल स्टोअर मधील औषधे घेऊन घरीच बरे होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र असे अंगावर आजारपण काढणारे लोकच कोरोनाचे प्रसारक ठरत आहेत. नियमांचे पालन करण्याबाबत शासकीय यंत्रणेने केलेल्या आव्हानाला लोक जुमानत नसल्याचे दिसत आहे. यामुळे परिस्थिती बिघडत असून रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे त्या त्या गावातील लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी अशा लक्षणे दिसणाऱ्या लोकांचे प्रबोधन केले पाहिजे. त्यांना तातडीने कोरोना टेस्ट करून घेण्यास प्रवृत्त केले पाहिजे. गावातील लोक हे मतदार असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांना मानणारे असतात, त्यामुळे ते त्यांचे ऐकून टेस्ट करून घेतील. यामुळे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण लवकर बरे होऊ शकतील. गावातील रुग्णांची विचारपूस करून त्यांना धीर देणेही महत्वाचे आहे. यादृष्टीने लोकप्रतिधिनी व पदाधिकऱ्यांनी काम करावे. आपल्या घुमडे गावातही आपण ही संकल्पना राबवली, त्यास चांगला प्रतिसाद मिळून अनेक रुग्ण लवकर बरे झाले, ही संकल्पना सर्वत्र राबविल्यास जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही, असेही दत्ता सामंत म्हणाले.

You cannot copy content of this page