भंडारी नेते, माजी नगरसेवक, स्वामी भक्त बाळू कोळबकर यांचे निधन

मालवणवर शोककळा

मालवण दि प्रतिनिधी मालवणचे माजी नगरसेवक आणि सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षाचालक मालक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच मालवण भरड येथील रहिवासी भालचंद्र उर्फ बाळू हरिश्चंद्र कोळंबकर (५७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. भंडारी समाजाचे नेते असणाऱ्या बाळू कोळंबकर यांच्या अकाली निधनाने मालवणवर शोककळा पसरली आहे. मालवण भरड भागातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून जनसामान्यात मान्यता पावलेले माजी नगरसेवक बाळू कोळंबकर हे कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जायचे. ९० च्या दशकात श्री. कोळंबकर हे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. १९९६ मध्ये मालवण नगरपालिकेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत श्री. कोळंबकर हे काँग्रेस प्रणित आचरेकर गटातून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. या पाच वर्षाच्या कालावधीत त्यांनी दवाखाना आणि आरोग्य सभापती पद भूषविले होते. २००१ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत श्री. कोळंबकर हे दुसऱ्यांदा विजयी झाले. जनसामान्यात जाऊन काम करण्याची वृत्ती जोपासणाऱ्या श्री. कोळंबकर यांना त्या काळातही नगरपालिकेचे बांधकाम सभापती हे महत्त्वाचे पद देण्यात आले होते. या निवडणुकीच्या दरम्यान आचरेकर गटाच्या नगरसेवकांनी तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. त्या प्रवेश करणाऱ्यांमध्ये श्री. बाळू कोळंबकर यांचा समावेश होता. श्री. कोळंबकर यांनी त्यावेळपासून आजपर्यंत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नेतृत्व स्वीकारून काम केले. मालवणच्या भंडारी हायस्कूलचे माजी विद्यार्थी असणाऱ्या बाळू कोळंबकर यांनी शालेय जीवनात उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून नावलौकिक मिळविलेला होता. उमेदीच्या काळात त्यांनी रिक्षा व्यावसायिक म्हणूनही काम केले त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांचे प्रश्न त्यांना जवळून माहीत होते. सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा व्यावसायिक चालक मालक संघटनेचे ते माजी अध्यक्ष होते. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदही भूषविले होते. जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात श्री. कोळंबकर हे नेहमी तत्पर असत. मालवण तालुका भंडारी पतसंस्थेचे माजी संचालक होते. त्यांच्या निधनाने मालवण शहरासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. मालवण सोमवारपेठ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे.

You cannot copy content of this page