ग्रामस्थ १ मे रोजी उपोषणाला बसणार :जि प सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा इशारा..
⚡कुडाळ ता.१७-: हजारो ग्रामस्थांची तहान भागविणाऱ्या पिंगुळी पाझर तलावाच्या परिसरात आता एका विकासकाकडून बांधकामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे भविष्यात सांडपाणी जाऊन या तलावाचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे, अशी भीती पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या तलावाकाठी बांधकाम करण्यासाठी पिंगुळी ग्राम पंचायतने ना हरकत दाखला दिला आहे. भविष्यात स्थानिक लोकांच्या जीवितास धोका पोहोचविणाऱ्या या प्रकल्पाविरोधात येत्या एक मे रोजी पिंगुळी ग्रामस्थांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा गंगाराम सडवेलकर यांनी दिला आहे. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना गंगाराम सडवेलकर म्हणाले, पिंगुळी पाझर तलावाबाबत पिंगुळी ग्रामस्थांच्या तीव्र भावना आहेत. त्या तलावाकाठी एका कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर बांधकामे होणार आहेत. या बांधकामामुळे सांडपाणी त्या तलावात जाऊन ग्रामस्थांच्या जीवितालाधोका निर्माण होऊ शकतो. या पाझर तलावाचा उपयोग पिंगुळी ग्राम पंचायत गेली २५ ते ३० वर्षे करत आहे. या तलावावर सुमारे १५ ते २० हजार ग्रामस्थ पाण्यासाठी अवलंबून आहेत. पिंगुळी ग्रा.प. मार्फत या पाझर तलावावर नळपाणी योजना राबविली जाते. त्याचे अडीज हजार ग्राहक आहे. ते असताना सुद्धा ग्रा.प. ने विकासकाला रेखांकनासाठी एनओसी दिली आहे. वास्तुविक हा तलाव जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे आहे. पण या विभागाची परवानगी ना घेता विकासकाकडून रेखांकन सुरु आहे. असे असताना लघु पाटबंधारे विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल श्री. सडवेलकर यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान विकासकाने हे सगळं आर्थिक हितसंबंधांसाठी काही लोक करत असल्याची तक्रार ल.पा. विभागाकडे केली आहे. अशी जर तक्रार ल.पा. कडे दिली असेल तर लघु पाट बंधारे विभागाने या विरोधात पोलिसांकडे जायला पाहिजे होते, याकडे श्री. सडवेलकर यांनी लक्ष वेधले. रेखांकन झाल्याने तलावाकाठच्या मातीची उलथापालथ होणार आहे. हि सगळी माती पावसाळ्यात तलावात जाणार आहे. त्यामुळे तलावाची पाणी धारण क्षमता कमी होऊ शकते. या प्रकल्पासाठी आजूबाजूच्या झाडांची तोड झाल्याने पर्यावरणाला देखील धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच याकडे लक्ष वेधण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थ येत्या एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत असे श्री. सडवेलकर यांनी सांगितले.
