मत्स्यालयासाठी आणलेला ५ कोटींचा निधी मागे गेल्याने वैभव नाईक यांचा मालवण नगरपालिका प्रशासनावर संताप…

विविध प्रश्नांवरून मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब..

⚡मालवण ता.१५-: माजी आमदार वैभव नाईक यांनी ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांसह आज मालवण नगरपालिकेत धडक देत मालवण शहरातील प्रलंबित विकासकामे, प्रशासकीय उदासीनता आणि मत्स्यालयासाठी आलेला निधी परत गेल्याच्या मुद्द्यावरून मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शहरात मत्स्यालय होण्यासाठी आणलेला सुमारे ५ कोटींचा निधी व्याजासह परत जाणे हे प्रशासनाचे अपयश असल्याची टीका यावेळी नाईक यांनी करत आमच्या सत्ताकाळात आणलेल्या निधीचा विनियोग होणे गरजेचे आहे, मात्र येथील लोकप्रतिनिधी त्याबाबत सकारात्मक न राहिल्याने निधी परत जाण्याची नामुष्की आली, असा आरोपही नाईक यांनी केला.

माजी आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण नगरपालिकेस भेट देत शहरातील विविध समस्यांसंदर्भात मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्याशी चर्चा केली.
यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, महेश जावकर, पूजा करलकर, गौरी सावंत, हेमंत मोंडकर, उमेश चव्हाण, सिद्धेश मांजरेकर, दत्ता पोईपकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वैभव नाईक म्हणाले की, “मत्स्यालयासाठी विशेष बाब म्हणून आम्ही ५ कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. मत्स्यालयासाठी जागा संपादन करण्यासाठी तो निधी आणला होता. मात्र, प्रशासकीय दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी सन २०२५ मध्ये हा निधी व्याजासह परत गेला आहे. निधी बरोबरच त्यावरील व्याजही मागे गेले. याबाबत वेळेत पत्रव्यवहार झाला असता, त्याबाबत लोकप्रतिनिधी सकारात्मक राहिले असते निधी मागे गेला नसता. आज शहरात एक भव्य मत्स्यालय उभे राहिले असते. आता नगरपालिकेकडे जिल्हा नियोजनाशिवाय अन्य कोणताही मोठा निधी शिल्लक नाही, असेही नाईक म्हणाले.

यावेळी महेंद्र म्हाडगुत यांनी मासळी मंडईतील गाळे पडून आहेत. त्यांचा वापर करून नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे सांगितले. नगरपालिकेच्या पार्किंगचा वापर होत नाही. कारण त्याच्या पुढील जागेत अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ती हटविण्यात यावीत. पार्कींगसाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात यावी असे तपस्वी मयेकर यांनी सांगितले. नगरपालिकेच्या ज्या ज्या जागा आहेत त्या नगरपालिकेने ताब्यात घ्याव्यात असे पूजा करलकर यांनी सांगितले. भुयारी गटार योजनेचे काम अपूर्ण असल्याने संबंधित ठेकेदाराची नगरसेवकांसोबत बैठक लावून योजनेचे काम पूर्ण कसे होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत असे सांगण्यात आले.

पावसाळा जवळ आल्याने शहरातील गटारे, व्हाळ्या साफसफाईचे काम केव्हा सुरू होणार अशी विचारणा मुख्याधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावर टेंडर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. बाजारपेठेत नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमण करत हॉटेल उघडण्यात आले आहे. त्याची ड्रेनेज व्यवस्था काय आहे याची पाहणी स्वच्छता निरीक्षकांनी केली आहे काय? असा प्रश्न म्हाडगुत यांनी उपस्थित करत त्यावर नगरपालिका प्रशासन कोणती कारवाई करणार अशी विचारणा करण्यात आली. गवंडीवाडा येथे पाण्याची मोठी टाकी बांधण्यात आली आहे. मात्र त्याचा वापर होत नाही. धामापूर नळपाणी योजनेचे कनेक्शन या टाकीला दिल्यास गवंडीवाडा, आडवण या भागास मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होऊ शकतो असे मंदार ओरसकर यांनी सांगितले. कचरा संकलन हे घरोघरी जात गोळा करायचा असताना स्वच्छता कामगार गल्ल्यांमध्ये, घरोघरी जात नसल्याची तक्रार तपस्वी मयेकर यांनी केली. नगरपालिकेच्या विविध जागा ताब्यात घेऊन त्यांचा शहराच्या विकासासाठी वापर करावा, अशी आग्रही मागणीही यावेळी नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली.

भुयारी गटार योजना गेले अनेक वर्षे बंद आहे. भुयारी गटार योजना तसेच पाणी पुरवठा योजना यासाठी आमच्या सत्ताकाळात निधी आणला होता. आमच्या सत्ताकाळात आणलेल्या निधीचा योग्य विनियोग होणे गरजेचे आहे. चुकीच्या कामांना आमचा कायम विरोध असेल, मात्र शहराच्या हिताच्या चांगल्या कामांना आम्ही निश्चित सहकार्य करू. शहरातील या प्रलंबित सर्व प्रश्नांबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकाऱ्यांचेही लक्ष वेधणार आहोत, असे यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page