कणकवलीत धनगर समाज महासंघाची बैठक संपन्न.!

संघटना नव्हे, एक विचार नवलराज काळे यांचे
प्रतिपादन..

कणकवली : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ही एक संघटना नसून एक विचार आहे. तळागाळातील समाज बांधवांना न्याय देण्यासाठी काम करणारी ही सेवाभावी संस्था असून हे आपले कुटुंब आणि घर आहे. महासंघ जितका मजबूत करू, तितक्या ताकदीने समाजाचे प्रश्न सोडवू शकतो. त्यामुळे सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे यांनी केले.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ ची सिंधुदुर्ग जिल्हा बैठक कणकवली येथे संपन्न झाली. यावेळी प्रदेश संघटक विजय कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हाध्यक्ष (मुख्य आघाडी) विजय खरात, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष साळसकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची फेरनिवड झाल्याबद्दल तसेच ‘महाराजा यशवंतराव होळकर पुरस्कार’ मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. संघटनेचे ध्येय, धोरण आणि बांधणी कशी असावी याबाबत नवलराज काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रवीण काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी व मुख्य आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सभेचे कामकाज जिल्हाध्यक्ष विजय खरात व युवक अध्यक्ष संतोष साळसकर यांनी पाहिले. अध्यक्षीय भाषणात प्रदेश संघटक विजय कोकरे यांनी संघटनेचे कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले.

बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा ओरस येथील जिल्हा मुख्यालयात उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दळणवळणाच्या सुविधांबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आवश्यकतेनुसार रस्त्यावर उतरून लढा देण्याची तयारीही महासंघाने दर्शविली.

यावेळी अंकुश जंगले, राजेंद्र माने, अॅड. विक्रमसिंह काळे, धुळू कोळेकर, राया काळे, प्रकाश कोकरे, संदीप बोडेकर, संतोष जंगले, राहू खरात, तुषार शिंगाडे, अथर्व जंगले, गंगाराम शिंदे, राजेश गावडे, किशोर काळे, अंकित शेळके, गणेश खरात आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

दरम्यान, महासंघाच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवक आघाडी व मुख्य आघाडीच्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

You cannot copy content of this page