शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी भरपाई; ‘आता सरकारला धडा शिकवू…

“२२० रुपयांत शेतकऱ्यांचा अपमान; ‘वर्षावर धडक देऊन न्याय मिळवू:जामसंडे येथील आंबा बागायतदारांच्या एल्गार मेळाव्यात राजू शेट्टी गरजले !

⚡देवगड ता.१२-:
राज्य सरकारने शक्तीपीठ महामार्ग असो की कुंभमेळा, त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे ठरविले आहे. मात्र कोकणातील आंबा व काजू बागायतदारांना ५० कोटींची मदत देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. यंदा आंब्याच्या नुकसानीपोटी या सरकारने प्रति झाड २२० रुपये भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. कोकणातील मजूर प्रती दिवस आठशे रुपये मजुरी घेतो. त्याची तुलना केली, तर दिलेली नुकसान भरपाई एकप्रकारे थट्टाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्यासाठी वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा निर्णय येत्या शनिवारी रत्नागिरी येथील सभेत घेतला जाईल, असा इशारा स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

जामसंडे येथील सांस्कृतिक भवन येथे शनिवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग यांच्या एल्गार मेळाव्यात श्री. शेट्टी यांनी राज्य शासनाविरोधात पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली. यावेळी रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने, आंबा, काजू बागायतदार व व्यापारी महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष काका ढोके, वेंगुर्ले येथील आंबा बागायतदार संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे, कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, सुधीर जोशी, आप्पा अनभवणे, पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, राजेंद्र गडयानवार आदी उपस्थित होते.

राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर सडकून टीका करत भरपाईतील अन्यायाचा जाब विचारण्यासाठी थेट मुंबईतील वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा निर्धार व्यक्त केला. “प्रश्न सुटण्यासाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. कोणत्याही दबावाला बळी पडायचे नाही, कोकणातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी ही लढाई आहे,” असे ते ठामपणे म्हणाले. त्यांनी कोकणातील तसेच मुंबईतील कोकणी बांधवांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. धडक मोर्चाची तारीख येत्या शनिवारी रत्नागिरी येथे होणाऱ्या सभेत जाहीर केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आंबा बागायतदारांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी व्यापाऱ्यांनाही इशारा दिला. “यंदा कोणत्याही परिस्थितीत बागायतदारांकडून व्याजी रक्कम वसूल होऊ देणार नाही. धाक दाखवून वसुली केल्यास ती सहन केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच इतर राज्यांतील आंबा आणून देवगड व रत्नागिरी आंबा म्हणून विक्री करण्याचा प्रकार झाल्यास तो उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला.

व्यापारीवर्गाने सकारात्मक भूमिका दर्शवली असून आंबा विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक नेमले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बाजारभाव पाडण्याचा कोणताही कट सहन केला जाणार नाही, असेही शेट्टी यांनी ठामपणे सांगितले.

माजी आमदार बाळ माने यांनीही या आंदोलनाला जोरदार पाठिंबा देत “गर्दीपेक्षा दर्दी शेतकरी महत्त्वाचा आहे” असे सांगितले. देवगडमध्ये सुरू झालेले आंदोलन आता संपूर्ण कोकणात पसरले असून मंडणगडपर्यंतच्या शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सरकारवर टीका करत “जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. पंचनामेच झाले नाहीत, मग मदत मिळणार कशी?” असा सवाल उपस्थित केला.
यावेळी काका ढोके, आप्पा अनभवणे, राजेंद्र गडयानवार, सुधीर जोशी, संजय गावडे, विजय कोंडकर, गणेश गावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किरण टेंबुलकर यांनी केले तर सूत्रसंचालन सागर जोईल यांनी केले.

You cannot copy content of this page