असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्री विरोधात गावक-यांची एकजुट…

असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात एकमुखी ठराव ; पर्यावरण रक्षणाबरोबरच गावाचा एकोपा राखण्यासाठी निर्णय..

⚡कणकवली ता.१२-:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावा पाठोपाठ आता कणकवली तालुक्यातील असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. गावाच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक , स्थानिकांचे हक्क , एकोपा राखण्याच्या संरक्षणासाठी हा एकमुखी ठराव करत निर्णय घेण्यात आला.

असलदे गावठणवाडी येथील असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिरात सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली गाव सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला सोसायटी चेअरमन भगवान लोके , उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वायंगणकर , असलदे तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकृष्ण परब , माजी सरपंच सुरेश लोके, उद्योजक सुरेश डामरे , पत्रकार नरेंद्र हडकर , मानकरी उदय परब, शत्रुघ्न डामरे , दयानंद हडकर , प्रदीप हरमलकर , अनिल कोठारकर , अजय परब, प्रविण डगरे , सचिन लोके , मेहुल घाडी , योगेश डामरे , दिलीप डामरे , संतोष घाडी , पोलीस पाटील संजय गोरुले , आत्माराम घाडी , विजय डामरे , विजय आचरेकर , प्रशांत परब , बाबाजी शिंदे , परशुराम परब , मनोज लोके , गणेश तेली , विजय खरात , सचिन शिंदे , विजय परब , महेश लोके , श्रीराम मोरजकर , जयप्रकाश पाताडे , सुनील परब, हरिचंद्र जांभळे , शामराव परब , तुषार घाडी , गोविंद तावडे , प्रकाश खरात , संजय जेठे , सचिन हरमलकर आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ‌्या संख्येने उपस्थित होते.

कोकणात नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबरच पर्यावरण पुरक वातावरण असल्यामुळे बाहेरील राज्यातील काही गुंतवणुक करणा-या कंपनी , उद्योजक सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करीत आहेत. आगामी काळात गावातील हेक्टरी जमीन विक्री झाल्यास भूमीपुत्र विस्तापित होवू शकतात . भविष्यात विक्री व्यवहार पूर्ण झाल्यानंतर लढा उभारण्यापेक्षा आपल्या गावाची एकजूट ठेवून अशा जमिन खरेदी विक्री करणा-या परप्रांतीयांना बंदी घालण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. त्यामध्ये गावातील हिंदू समाजाच्या रुढी परंपरा , पारंपारिक सण उत्सव , देवस्थानची कामे करताना बाधा निर्माण होवू शकतो. आगामी काळात आपल्या भूमिपुत्रांमध्ये मतामतांतरे निर्माण होवू शकतात. जर परप्रांतीयांकडून जमीन खरेदीचे व्यवहार झाल्यास गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती, जंगल आणि जैवविविधतेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या गावातील शेतक-यांच्या आंबा , काजू बागायतीवर असलेली उपजीवीका जमीन न विकता ठेवण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरली आहे.

गाव सभेत झाला ऐतिहासिक ठराव –
असलदे चव्हाटा येथे गाव बैठकीत श्रीदेव रामेश्वर पावणाई चव्हाटा येथे गावातील भूमीपुत्रांच्या जमिनी विक्रीबाबत महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. यापुढील काळात जमिनी विकताना पहिल्यांदा भावकीला , नंतर वाडीतील शेजा-याला त्यानंतर गावातील व्यक्तीला शक्यतो जमिनीची विक्री करावी , असे ठरवण्यात आले. पर्यावरण रक्षणाबरोबरच सण, उत्सव , संस्कृती रक्षणासाठी परप्रांतीयांनी जमिन विक्रीस बंदी घालण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गाव पाठोपाठ असलदे गावाने घेतलेला हा निर्णय केवळ जमीन व्यवहारांपुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, स्थानिक हक्क आणि सांस्कृतिक ओळख जपण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

You cannot copy content of this page