सरपंच उदय नारळीकर, उपसरपंच संजय आयरे यांचा पुढाकार;११० शेतकऱ्यांना मिळाले सुधारित वाण
*💫सिंधुदुर्गनगरी दि २५-:* शासनाच्या १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गावराई ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ११० शेतकऱ्यांना मोफत सुधारित भात बियाण्याचे वाटप करण्यात आले. कुडाळ तालुक्यातील गावराई ग्रामपंचायतीच्या वतीने २४ व २५ मे रोजी शासनाच्या १५ व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत गावातील सर्व शेतकऱ्यांना सुधारित जातीचे भात बियाणे मोफत वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. कोरोना साथरोग प्रतिबंधक उपाय योजनाच्या अटीशर्तीला अधीन राहून गावराई ग्रामपंचायतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला गर्दी होऊ नये यासाठी सोमवारी २४ मे रोजी ५० टक्के शेतकरी आणि मंगळवारी २५ मे रोजी ५० टक्के शेतकरी असे विभाजन करत गावातील एकूण ११० शेतकऱ्यांना भात बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे. यावेळी गावराई सरपंच उदय नारळीकर, ग्रामसेवक एस जी वारंग, उपसरपंच संजय आयरे, ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप राऊत, किसन चिंदरकर, शंकर सावंत आदी उपस्थित होते.कोरोना साथरोगामुळे संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांची गरज विचारात घेऊन गावराई ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना भात बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
