रिक्षा व्यवसायिकांसाठी हक्काचे ठिकाण”…

मिठबाव येथे अधिकृत रिक्षा स्टॅण्डचा शुभारंभ:सरपंच भाई नरे यांचा पुढाकार; पार्किंगच्या समस्येला दिले प्राधान्य..

⚡देवगड ता.०९-: “१९८० दशकात मी स्वतः रिक्षा व्यवसाय केला असल्यामुळे रिक्षा व्यवसायिकांच्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहित आहेत. गावात रिक्षा व्यवसायाची सुरुवात मीच केली होती. मात्र आजही रिक्षा चालकांना हक्काची पार्किंगची जागा नव्हती. त्यामुळे ही समस्या सोडवणे हे माझे प्रथम कर्तव्य मानले,” असे प्रतिपादन मिठबाव सरपंच महादेव उर्फ भाई नरे यांनी केले.
मिठबाव येथे आरटीओ मान्यताप्राप्त रिक्षा स्टॅण्डच्या नामफलकाच्या अनावरण व शुभारंभ कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या नव्या रिक्षा स्टॅण्डमुळे स्थानिक रिक्षा व्यवसायिकांना अधिकृत व सुरक्षित पार्किंगची सुविधा उपलब्ध झाली आहे.
या कार्यक्रमास देवगड पंचायत समितीचे माजी सभापती मनोज सारंग, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष पंडित पारकर, जमीन मालक पंडित लोके, सौ. समृद्धी लोके, मिठबाव व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रवीण लोके, तसेच रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विजय काळे, उपाध्यक्ष स्वप्निल नरे, सचिव गुरुदत्त डगरे, खजिनदार निलेश वायंगणकर यांच्यासह ऐतराज नरे, राजेंद्र नरे, सुभाष चेंदवणकर, संजय फाटक, संतोष जोगल, सुहास फाटक, लवू शिरवाडकर, गणेश लोके, रुपेश काणेकर, महेश राजम, राहुल जेठे, गणपत फाटक आदी मान्यवर व रिक्षा व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिठबाव गावात एकूण २८ नोंदणीकृत रिक्षा व्यवसायिक कार्यरत आहेत. या रिक्षा स्टॅण्डसाठी शिवशंकर उर्फ पंडित लोके यांनी दोन गुंठे जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली. या ठिकाणी अधिकृत रिक्षा स्टॅण्ड मंजूर व्हावा यासाठी सरपंच भाई नरे, शैलेश लोके आणि रिक्षा संघटनेचे अध्यक्ष विजय काळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
कार्यक्रमादरम्यान रिक्षा संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच आपल्यातील सहकारी दिवाकर फाटक यांचे अचानक निधन झाल्याने त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

You cannot copy content of this page