पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला गाठले:कणकवली येथील घटना..
⚡कणकवली ता.०९-: कामावरून घरी परतणाऱ्या एका ४३ वर्षीय महिलेचे सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दोन दुचाकीस्वारांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता आशिये – सोनगेवाडी परिसरात घडली. रिचा राजन रासम असे पीडित महिलेचे नाव असून त्या क्लिनिकमधील काम आटोपून घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ‘काळे सर कुठे राहतात?’ असा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवले. काही कळण्याच्या आतच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र ओढून घेतले आणि कणकवलीच्या दिशेने पळ काढला. या घटनेप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
