जिल्हा परिषद शिक्षण -आरोग्य सभापती प्रितेश राऊळ लक्ष पुरविणार का?..
⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला शहरात अद्ययावत असे उपजिल्हा दर्जाचे रुग्णालय नागरिकांसाठी संजीवनी मानले जात आहे. परंतु या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन गृहाचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल संपूर्ण तालुक्यातून नागरिकांतून व्यक्त होत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समस्याकडे नूतन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ गांभीर्याने लक्ष पुरविणार का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. तालुक्यातील एखाद्या गावात अपघात वा आकस्मिक घटना घडल्यास वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय गाठले जाते. परंतु वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथील पोस्टमार्टेम गृहाचे काम गेली कित्येक कालावधीत सुरु असून त्यामुळे मृताच्या नातेवाईकांना तुळस पीएचसी गाठावे लागते व गेली कित्येक महिने ही पद्धत सुरूच आहे. आडेली पीएचसी पोस्टमार्टेम गृह प्रस्ताव धुळखात पडला आहे? मागील कालावधीत आडेली देऊळवाडी येथील, मठ कणकेवाडी येथील व आज आठ एप्रिल रोजी वेतोरे देऊळवाडी येथील एक अशी कित्येक आकस्मिक मृत्यू प्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना तुळस पीएचसी लाच पाठविले जाते. त्यामुळे या गंभीर बाबीकडे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने त्वरित लक्ष पुरवावे, अशी मागणी जनतेतून करण्यात आली आहे. आरोग्य सुविधाच्या बाबतीत हेळसांड होत असेल तर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, वेंगुर्ला नगरपरिषद नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, नूतन पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष पुरवावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
