सावंतवाडी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा आणि त्यामुळे हॉटेल व्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, सावंतवाडी नगरपरिषदने महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे. शहरातील ४१ हॉटेल व्यावसायिकांना येत्या दीड महिन्यात नॅचरल गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय पालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले व उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांची विशेष बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सांगितले की, व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी गॅस कनेक्शन मिळणे आवश्यक आहे. व्यावसायिकांनी कागदपत्रांची पूर्तता आणि आवश्यक शुल्क भरून प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून दीड महिन्यात गॅस पुरवठा सुरू करता येईल.
व्यावसायिक कनेक्शनसाठी साधारण ६० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये कनेक्शन डिपॉझिट आणि अन्य चार्जेसचा समावेश असेल. गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून ५०० हून अधिक अर्ज आले होते, त्यापैकी २५० घरगुती कनेक्शन पूर्ण झाली आहेत. पहिल्या टप्प्यात घरगुती कनेक्शनवर भर दिल्यानंतर, आता गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिकांना प्राधान्याने कनेक्शन दिले जाणार आहे. हा गॅस परवडणारा असल्याने व्यावसायिकांनी लवकरात लवकर कनेक्शन देण्याची विनंती केली होती. त्यानुसार कंपनीने दीड महिन्याचा कालावधी निश्चित केला आहे. या बैठकीला उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर, नगरसेवक आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, प्रतिक बांदेकर, सुधीर आडीवरेकर व्यापारी संघटनेचे पुंडलिक दळवी, बाळ बोर्डेकर, किरण सिद्धे यांच्यासह जगदीश मांजरेकर, गुरुदास देवस्थळी, जितेंद्र पंडित, राजू भालेकर, परवेझ सय्यद आदींसह व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
