जनगणनेत प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका महत्त्वाची:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे..
⚡सिंधुर्दुर्गनगरी ता.०७-: जनगणना ही अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय प्रक्रिया असून अचूक व गुणवत्तापूर्ण माहिती संकलनासाठी प्रशिक्षित फील्ड ट्रेनर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सर्व फिल्ड ट्रेनर यांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी फिल्ड ट्रेनर यांना दिल्या.
जनगणना संचालनालय महाराष्ट्र व जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जनगणना २०२७ अंतर्गत क्षेत्रीय प्रशिक्षक (Field Trainer) यांचे प्रशिक्षण शिबिर दिनांक ०६ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२६ या कालावधीत मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी, श्रीम. प्रतिभा वराळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी , श्रीम.आरती देसाई, उपजिल्हाधिकारी (इमारत व दळणवळण) तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी व श्रीम. चैत्याली सावंत तहसीलदार महसूल तथा अतिरिक्त उपजिल्हा जनगणना अधिकारी यांची उपस्थिती होती.
ही जनगणना २०२६-२७ मध्ये होणार असून दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये स्वगणना व घरगणना पूर्ण होणार आहे. या मध्ये दि.१ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वगणना व दिनांक १६ मे २०२६ ते १४ जुन २०२६ घरगणना होणार आहे. यानंतर फेब्रुवारी २०२७ पासून दुसरा टप्पा कार्यवाही सुरु होणार असून यामध्ये लोकसंख्या गणना होण्याचे नियोजित आहेत.
आयोजित प्रशिक्षण शिबिरास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २४ फील्ड ट्रेनर्स उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये जनगणना २०२७ प्रक्रियेतील टप्पा एक नुसार घरगणना व घरयादी तसेच स्वगणना याबाबत सविस्तर मार्गदर्शन, मोबाईल अॅपचा वापर, तसेच माहिती संकलनाची पद्धत याबाबत श्री. अरुण साळगावकर, सांखिकी अन्वेषक तथा मास्टर ट्रेनर व श्री. सचिन पाटील, तहसीलदार कुडाळ तथा मास्टर ट्रेनर यांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी मच्छिंद्र सुकटे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.
०००००००
