कणकवली – सावंतवाडी दुकानफोडी प्रकरणाचा ३० तासांत उलगडा; एलसीबीची धडाकेबाज कारवाई…

रोहा येथून दोघे आरोपी ताब्यात; सलग दोन दिवसांत १६ दुकाने फोडून माजवला होता धुमाकूळ..

कणकवली : कणकवलीसह सावंतवाडी परिसरात सलग दोन दिवस दुकानफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांच्या जोडीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या ३० तासांत ताब्यात घेत मोठे यश मिळवले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या चोरीच्या मालिकेचा वेगाने उलगडा झाला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या सूचनेनुसार पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. हवालदार प्रकाश कदम, राजेंद्र गोसावी, किरण देसाई, आशिष गंगावणे यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे व जॅक्सन घोंसालवीस यांनी महत्त्वाचे सहकार्य केले.

या कारवाईत कणकवली रेल्वे स्टेशनवरील रेल्वे पोलिस दलाचे एएसआय यादव व हवालदार युवराज पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय रोहा पोलीस ठाणे व रोहा रेल्वे पोलिसांनीही तपासात हातभार लावला.

राहुल उर्फ दिवाण ओमप्रकाश तोमर (वय ३६) व राजपथ संतराम पाल (वय ५२), दोघे रा. भाईंदर पूर्व, घोडदेव नाका (मूळ रा. उत्तरप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांना रोहा (जि. रायगड) येथून ताब्यात घेऊन कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

विशेष म्हणजे, ४ एप्रिल रोजी कणकवलीत एका रात्रीत तब्बल १० दुकाने फोडल्यानंतर ५ एप्रिल रोजी सावंतवाडीत आणखी ६ दुकाने फोडून चोरट्यांनी दहशत निर्माण केली होती. सलग घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

मात्र, एलसीबी पथकाने अवघ्या ३० तासांत आरोपींचा शोध लावून त्यांना अटक करत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. या कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page